माणुसकीच्या भिंतीतून गरजूंची दीपावली होणार गोड

भगरीबाबा आधार फाउंडेशनचा उपक्रम;

दीड लाखावर कपडे वाटपाचा प्रयत्न

लासलगाव : समीर पठाण
सणांचा राजा म्हणून
दिवाळीची ओळख आहे. अनेक गरजवंतांना दिवाळीत चांगले कपडे घेणे शक्य होत नाही. मात्र, दीपावलीनिमित्त जवळपास सर्वच नागरिकांकडून घरातील चांगले कपडे बाजूला काढले जातात. याच कपड्यांचा वापर गरजूंना करता येईल आणि त्यांची दीपावली चांगले कपडे घालून गोड व्हावी, या उदात्त
हेतूने परमपूज्य भगरीबाबा आधार फाउंडेशन यांच्या वतीने गेल्या वर्षापासून माणुसकीची भिंत दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सुरू केली आहे. दरवर्षी हा उपक्रम राबविला जाणार असून, हे यंदाचे दुसरे वर्ष आहे.
गेल्या वर्षीपासून परमपूज्य भगरीबाबा आधार फाउंडेशन यांच्या वतीने माणुसकीची भिंत ही संकल्पना 17 ते 24 ऑक्टोबरपर्यंत लासलगाव शहरात विंचूर रोडवर राबवली गेली. पहिल्याच वर्षी जवळपास एक लाखापेक्षा जास्त जमा झालेल्या चांगल्या कपड्यांचे वाटप गरजवंतांना करण्यात
आले.
लासलगावसह परिसरातील अनेक नागरिक घरातील वापरात नसलेले कपडे धुऊन, स्वच्छ करून ते इस्त्री करत याठिकाणी आयोजकांकडे आणून देतात. आयोजक जे गरजू आहेत त्यांच्यासाठी विशेष सोय करत सर्व आलेल्या कपड्यांचे विलगीकरण करत गरजवंतांना चांगले कपडे देण्याचे काम केले जाते. अनेक महिला, तसेच युवक कपड्यांच्या घड्या व विलगीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करतात.
गोरगरीब तसेच गरजवंतांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून घरातील कामे सोडून परमपूज्य भगरीबाबा आधार फाउंडेशनचे सदस्य व तरुण या माणुसकीच्या भिंतीसाठी सहकार्य करतात. माणुसकीच्या भिंतीच्या माध्यमातून अनेक गरजूंंना दिवाळीत चांगले कपडे मिळत असल्याने अनेक दुःखी, कष्टकरी, गरजवंतांच्या चेहर्‍यावर यानिमित्ताने हसू
फुलल्याचे चित्र पाहायला
मिळते.

रेडिमेड कापड विक्रेत्यांचा मदतीचा हात

शहरातील अनेक नामवंत रेडिमेड कपडे विक्रेते दुकानात विक्री न झालेले अनेक दिवसांचे चांगले कपडे माणुसकीच्या भिंतीकडे आणून देतात. यांचादेखील या कार्यात सहभाग आहे. लासलगाव येथील माणुसकीच्या भिंतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

15 ऑक्टोबरपर्यंत कपडे वाटप

माणुसकीची भिंत या माध्यमातून लासलगाव शहरात साडी, ब्लाउज, शर्ट, पॅन्ट, जीन्स, लहान मुलांचे कपडे, कानटोप्या, उबदार कपडे यांसह अनेक चांगले कपडे याठिकाणी नागरिक आवर्जून आणून देतात. गरजूंंना चांगले कपडे यानिमित्ताने दिले जाणार आहेत. 10 ते 15 ऑक्टोबरपर्यंत चालणार्‍या या उपक्रमात जवळपास 1,50,000 कपडे वाटप करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे.

ऊसतोड कामगार, आदिवासींना देणार कपडे

सध्या ऑक्टोबर छाटणीनिमित्त अनेक आदिवासीबहुल भागांतून गोरगरीब आणि गरजू मजूर हे द्राक्षबागांच्या कामासाठी परिसरात येतात. तसेच ठिकठिकाणी ऊसतोड कामगार उतरले आहेत. या गरजू कामगार, तसेच मजूर वर्गाला त्यांच्या जागेवर संकलित झालेल्या कपड्यांतून चांगले कपडे नेऊन देत त्यांचीदेखील दिवाळी चांगली करणार असल्याचे यावेळी परमपूज्य भगरीबाबा माणुसकीची भिंतच्या सदस्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *