प्रकाश लोंढे यांच्या संपर्क कार्यालयात आढळले भुयार

सिडको : विशेष प्रतिनिधी
सातपूर येथील खंडणी आणि गोळीबार प्रकरणानंतर माजी नगरसेवक तसेच केंद्रीय राज्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रकाश लोंढे यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यांच्या कार्यालयात सापडलेल्या भुयारानंतर आता घरातूनही पोलिसांनी आणखी एक भुयार शोधून काढले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
प्रकरणाच्या चौकशीतून रोज नवनव्या गोष्टी समोर येत असून, पोलिसांनी लोंढे यांच्या घराची झडती घेतली असता काही लॉकर आणि कपाटे आढळली. एका कपाटातून थेट भुयारात जाणारा मार्ग असल्याचे आढळून आले. पोलिसांनी लोंढे यांना त्या भुयारात नेले असून त्याचा सखोल तपास केला जात आहे.
या प्रकरणाचा उगम ऑरा बार आणि रेस्टॉरंट प्रकरणाशी संबंधित आहे. रविवारी, दिनांक 5 रोजी, बारच्या मालकावर खंडणीसाठी गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांना अटक केली आहे. त्यांचा मोठा मुलगा भूषण लोंढे सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. लोंढे यांच्या कार्यालयाचे बांधकाम पूर्वी अनधिकृत ठरवून तोडण्यात आले होते. मात्र, नंतर पुन्हा त्याच ठिकाणी नव्याने कार्यालय उभारण्यात आले. आता त्यांच्या निवासस्थानातही भुयार आणि गोपनीय खोल्या आढळल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
पोलिसांचा तपास सध्या भुयारातील खोलीचा नेमका उपयोग काय होता, हे शोधण्यावर केंद्रित आहे. लोंढे यांना राजकीय आश्रय असल्यामुळेच त्यांची गुन्हेगारी फोफावल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *