गोरक्षणाचे महत्त्व सांगणारी ‘वसुबारस’

दीपावलीतील पहिला सण ‘वसुबारस’. आश्विन कृष्ण द्वादशीस हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात, याकरिता वासरासहित गायीची या दिवशी पूजा केली जाते. भारत हा पूर्वीपासून कृषिप्रधान देश असल्याने गोपालनाचे महत्त्व लोकांवर आधीपासूनच बिंबले आहे.
गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात, असे लहानपणी सांगितले जाई. त्यामुळे गाय दिसली की, तिच्या उदराला स्पर्श करून नमस्कार करण्याचा संस्कारच मुलांवर झालेला असे. गाय आणि तिच्या वासरांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक दिली जाई. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. गेल्या काही वर्षांत देशी गायींच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. धनाची निकड भागवण्यासाठी शेतकरी गोधन कसायाला विकू लागला आहे. सरकारने गायींच्या सन्मानार्थ तिला राज्यमातेचा दर्जा तर दिला आहे; मात्र तिच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी कोणतेही ठोस धोरण आखलेले नाही. परिणामी, राज्यात गायींची संख्या प्रतिदिन घटतच आहे.
गोवंशाने भरलेल्या गाड्या पोलिसांकडून किंवा गोरक्षकांकडून पकडल्या गेल्याच्या बातम्या हल्ली प्रतिदिन वृत्तपत्रात वाचायला मिळतात. त्यामुळे राज्यात खरोखर गोवंश हत्याबंदी कायदा आहे का, असा प्रश्न पडतो. जर कायदा अस्तित्वात आहे तर गुन्हेगारांना त्याचे भय का वाटत नाही? राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा अस्तित्वात येऊन आज 10 वर्षांहून अधिक काळ लोटला; मात्र या कायद्यान्वये कोणाला शिक्षा झाल्याचे आजतागायत ऐकिवात नाही. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असला तरी गोहत्या थांबलेल्या नाहीत. राज्यात अनेक ठिकाणी आजही प्रतिदिन गोवंश कापले जातात. बकरी ईदच्या निमित्ताने राज्यात हजारो गोवंशांची हत्या केली जाते. हिंदूंना पूजनीय असणार्‍या गोमातेला आणि गोवंशाला कायद्याने संरक्षण मिळावे म्हणून हा कायदा करण्यात आला, मात्र कायद्याची अंमलबजावणी आज केवळ कागदावरच होताना दिसतेय.
कोणतेही शुभकार्य असो किंवा धार्मिक पूजाविधी असो, गोग्रास दिल्याशिवाय ते पूर्ण होतच नाही. स्थानाची आणि वास्तूची शुद्धी करण्यासाठी गोमूत्र शिंपडले जाते. यज्ञादी विधीच्या ठिकाणी सात्त्विकता निर्माण व्हावी यासाठी तेथील भूमी गायीच्या शेणाने सारवली जाते. गोमातेच्या दुधाला तर अमृताची उपमा दिली जाते. लहान बाळाला आईनंतर पहिले दूध गायीचेच दिले जाते. गायीच्या दुधाचे महत्त्व शास्त्रज्ञांनीही मान्य केले आहे. गायीच्या दुधापासून अनेक दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती केली जाते. ज्यातून गोपालन करणार्‍याला वर्षभर उत्पन्न मिळते. देशी गायीचे तूप हे अनेक आजारांवर अत्यंत गुणकारी मानले जाते. गाय ही भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे ती उपयुक्त आणि श्रद्धेय का आहे याचा उल्लेख प्राचीन धर्मग्रंथांत आढळतो. वसिष्ठ ऋषींनी गोमातेवर संशोधन करून गायीच्या अनेक प्रजाती निर्माण केल्या. गोपालनाचे महत्त्व साक्षात भगवान श्रीकृष्णाने स्वतः गोपालन करून दर्शवले आहे. दत्तगुरूंनीही गोमातेची महती वर्णिली आहे. छत्रपती शिवरायांनी गोहत्येसाठी सरसावणारे कसायाचे हात जागेवर कलम करून गोरक्षणाचे महत्त्व रयतेवर बिंबवले होते. महाराजांनी हिंदवी स्वराज्यात गोपालनाला विशेष महत्त्व दिले. त्यामुळेच महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हटले जाते. पंजाब केसरी महाराजा रणजीत सिंह यांनी त्यांच्या कारकिर्दीत राज्यात गोहत्या करणार्‍याला मृत्युदंडाच्या शिक्षेचे प्रावधान केले होते. रामचंद्र बीर यांनी गोहत्या थांबवण्यासाठी 70 दिवस उपवास केला होता. हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि आध्यात्मिक संप्रदाय यांनी केलेल्या अथक पाठपुराव्यानंतर राज्यात गोवंश हत्याबंदी विधयेक आणण्यात आले; मात्र आजमितीला त्याच्या अंमलबजावणीमध्ये कमालीची ढिलाई दिसून येत आहे.
तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घातल्यावर ज्याप्रमाणे शरीरात सकारात्मक ऊर्जा तयार होते, त्याप्रमाणे गायीला प्रदक्षिणा घातल्या तरी आपल्या शरीरात तेवढ्याच प्रमाणात सकारात्मक ऊर्जा तयार होत असल्याचे युनिव्हर्सल स्कॅनर मापन यंत्राद्वारे करण्यात आलेल्या परीक्षणातून सिद्ध झाले आहे. ज्या भागात अधिक प्रमाणात गोहत्या होतात, त्या भागात भूकंप होतात, असे एका निरीक्षणातून सिद्ध झाले आहे. गायीला पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र जाणवते. त्यामुळे चरताना आणि विश्रांती घेत असताना गाय नेहमी दक्षिणोत्तर असते. नवजात गोवंशांच्या आवाजाच्या ऐकण्यामुळे मानसिक आजारांमध्ये सकारात्मक बदल होत असल्याचेही प्रयोगातून सिद्ध झाले आहे. गायीच्या पाठीच्या कण्यातील सूर्यकेतू मज्जातंतू हानिकारक किरणोत्सर्गाला रोखून पर्यावरण स्वच्छ ठेवते. अशा कितीतरी प्रयोगांतून देशी गायीची उपयुक्तता सिद्ध झाली आहे.
वाढत्या गोहत्येमुळे आज देशी गायींची संख्या कमालीची घसरली आहे. देशी गायीच्या अनेक प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. अधिक दुधाच्या हव्यासाने आज अनेक जण संकरित गायीचे पालन करत आहेत. मात्र, संकरित गायीच्या दुधात देशी गायीप्रमाणे कोणतीच उपयुक्त तत्त्वे नसतात. आजमितीला राज्यात असेही उद्योजकही आहेत ज्यांनी देशी गायींचे महत्त्व ओळखून त्यांचे पालन करून गायीच्या दूध, शेण आणि गोमूत्र यांच्या विक्रीतून कोट्यवधींचा व्यवसाय उभा केला आहे. यातून इतरांनीही प्रेरणा घ्यायला हवी. राज्य सरकारने गोशाळांसाठी अनुदान देण्याची योजना तर आखली आहेत; मात्र त्याचा लाभ फारच कमी गोशाळांना मिळतो. परिणामी, अनेक गोशाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या गोशाळा बंद पडल्या तर भविष्यात यांतील गोवंशाच्या चारापाण्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. छत्रपतींच्या राज्यात गोमातांवर ओढवलेली ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. राष्ट्रीय स्तरावर गोवंश हत्याबंदी कायदा करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे, मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गोमाता जसे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे, तशी ती सर्वांत उपयुक्त प्राणी असल्याचेही जागतिक स्तरावर सिद्ध झाले असताना, गायीच्या रक्षणाचे कोणतेच प्रावधान केंद्र शासनाने आजतागायत केलेले नाही. याउलट बीफ व्यवसायात अनेक नेतेमंडळींचे आर्थिक हितसंबंध आहेत. देशात अशीच गोहत्या होत राहिली तर उद्या नावालाही गोवंश शिल्लक राहणार नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *