पहाटेपासून कारवाई; नाशकातही यूपीचा बुलडोझर पॅटर्न
नाशिक : प्रतिनिधी
सातपूर गोळीबार प्रकरणात अटकेत असलेले रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या बेकायदेशीर बांधकामावर महापालिकेने गुरुवारी (दि.16) कारवाई करत हे बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आले. महापालिकेने धाडलेल्या नोटिसीला कुठलेही उत्तर न मिळाल्याने महापालिकेने सदर इमारत जमीनदोस्त केली. दरम्यान, या इमारतीचा लोंढे टोळीकडून खंडणी, अपहरण आदींसह गैरकृत्य करण्यासाठी वापर सुरू होता. दरम्यान, लोंढे यांनी राजकीय दबावाचा वापर करत थेट नंदिनी नदीच्या पूररेषेतच बेकायदेशीर इमारत उभी केली होती.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात नाशिक पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यात महापालिकेनेही उडी घेतली असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, लोंढे यांनी 25 बाय 15 मीटरचा तळमजला, पहिला मजला आणि त्यावर होर्डिंग लावण्यासाठी केलेली इमारत साधारणपणे तीन-चार वर्षांपूर्वी नंदिनी नदीच्या पूररेषेत बांधली व इमारतीत भाडेकरू टाकून त्यांच्याकडून भाडे वसूल केले जात होते. दरम्यान, गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या प्रकाश लोंढे आणि त्यांचा पुत्र दीपक लोंढे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाईला सुरुवात केली. चार दिवसांपूर्वी लोंढेंच्या आणखी एका इमारतीत भुयार आढळून आल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. त्यामुळे याही इमारतीचा गुन्हेगारी कारणासाठी वापर केला जात असल्याचा पोलिसांना संशय असून, गुरुवारच्या कारवाईतून गुन्हेगारांना इशारा दिला आहे. लोंढेंच्या इमारतीचे पाडकाम झाल्यानंतर आजूबाजूच्या झोपडपट्टीमधील अनधिकृत घरांनाही नोटीस पाठवून तेही पाडले जाणार आहे. आयटीआय सिग्नल परिसरातील एका बारमध्ये खंडणी उकळण्यासाठी गोळीबाराची घटना घडली होती. त्यात एक जण गंभीर जखमी झाला होता. त्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, भूषण लोंढे अजूनही फरार आहे. त्यामुळे दहशत माजविण्याचे त्यांचे अड्डे जमीनदोस्त करण्याची कारवाई केली. लोंढे यांनी उभारलेल्या इमारतीत भुयार सापडले होते. तर इमारतीच्यावर होर्डिंगसाठी लोखंडाचा मोठा सांगाडा उभारण्यात आला होता. या माध्यमातून होर्डिंग लावून परिसरात दहशत माजवण्याचा प्रकारदेखील होत होता. याशिवाय, या ठिकणाहून लोंढे यांना लाखो रुपयांचा आर्थिक फायदा होत होता. सदर कारवाईवेळी अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संगीता नांदूरकर, सुवर्णा दखणे, सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आहिरे, विभागीय अधिकारी राजाराम जाधव, जयश्री बैरागी, डॉ. प्रज्ञा त्रिभुवन आदींसह सहा विभागांचे सहायक अधीक्षक उपस्थित होते.
इतके कर्मचारी
140
कर्मचारी बांधकाम पाडण्यासाठी
20
कर्मचारी उपद्रव शोध पथकातील
100
पोलिसांचा ताफा तैनात
सकाळी सहापासून कारवाईला सुरुवात
महापालिकेच्या अतिक्रमणची कुमक बुधवारीच कांबळेवाडीच्या बेकायदेशीर बांधकाम असलेल्या ठिकाणी पोहोचली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी सहा वाजेपासून सुरू झालेली कारवाई सायंकाळपर्यंत सुरू होती.
मोहिमेत इतकी यंत्रसामग्री
1 जेसीबी
2 पोकलेन
9 वाहने
1 क्रेन
1 रुग्णवाहिका
1 अग्निशमन वाहन
बुधवारी सायंकाळी लोखंडी कमान काढल्यानंतर गुरुवारी सकाळपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. तसेच लोंढे यांच्या कार्यालयात भुयार आढळून आल्याने त्यांना नोटीस पाठवली जाणार आहे. यावेळी उत्तर न मिळाल्यास सदर बांधकामावर कारवाई केली जाईल.
-स्मिता झगडे, अति. आयुक्त, मनपा