आरोग्य जपत फराळाचा आनंद लुटा

गिल्ट-फ्री दिवाळी : आहारतज्ज्ञांचा सल्ला

नाशिक ः प्रतिनिधी
वर्षभर ज्या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात तो प्रकाशाचा, आनंदाचा आणि दिव्यांचा सण म्हणजे दिवाळीला आजपासून प्रारंभ झाला. घराघरांत साफसफाईची लगबग, बाजारपेठेत खरेदीचा उत्साह, मुलांच्या चेहर्‍यावर फटाक्यांचा आनंद आणि मोठ्यांच्या मनात सुट्टीत गावी जाण्याची किंवा पर्यटनाला जाण्याची उत्सुकता दिसते. परंतु, या सणात एक असा वर्ग आहे, ज्याच्या मनात थोडीशी काळजी डोकावते – वजन वाढेल का? आहार नियंत्रण सुटेल का?

दिवाळीचा आनंद गिल्ट-फ्री पद्धतीनेही उपभोगता येतो. योग्य नियोजन आणि संतुलित सवयींनी फराळाचा आस्वाद घेत आरोग्यही टिकवू शकतो. दिवाळीत वातावरण थंड असल्याने तळलेले, मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर घसा दुखण्याची शक्यता असते, त्यामुळे दिवसभर कोमट पाणी पिण्याची सवय लावा. थंड पाणी, कार्बोनेटेड ड्रिंक, चहा-कॉफी यांचे अतिसेवन टाळा. तज्ज्ञांच्या मते, सकाळची सुरुवात डिटॉक्स ड्रिंकने करणे अत्यावश्यक आहे. आपल्या गरजेनुसार बिना साखरेचे लिंबूपाणी, आवळ्याचा रस, मेथीदाण्याचे पाणी किंवा बडीशोप, ओव्याचे पाणी घेणे उपयुक्त ठरते. अभ्यंगस्नानासोबत व्यायामालाही प्राधान्य द्यावे. व्यायामासाठी वेळ मिळाला नाही तरी घरातील कामे स्वतः करणे, खरेदीसाठी पायी जाणे किंवा लहान मुलांसोबत खेळणे हे शरीर सक्रिय ठेवण्याचे उत्तम पर्याय आहेत. फराळ घरगुती पद्धतीने आणि कमीत कमी तेलात तयार करा. गोड पदार्थ तयार करताना साखरेऐवजी खजूर, खोबरे, मनुका किंवा काकवीसारखे नैसर्गिक गोड वापरा.


भूक लागल्यावरच जेवा, आहारात दही किंवा ताकासारखे प्रोबायोटिक पदार्थ ठेवले तर पचन सुधारते आणि गॅसेस किंवा अ‍ॅॅसिडिटीचा त्रास होत नाही. बाहेर जाण्यापूर्वी घरी जेवण करून जा, बाहेरचे अन्न कमी खा आणि खाण्याचा वेग कमी ठेवा, त्यामुळे मेंदूला पोट भरल्याची नोंद घेण्यासाठी वेळ मिळतो. घरात जास्त गोड पदार्थ साठवू नका आणि रिफाइंड तेल, मैदा, साखर यांचा वापर टाळा. साजूक तूप प्रमाणात वापरले तर ते आरोग्यासाठी हितावह ठरते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *