लक्ष्मीपूजनास केरसुणीला अनन्यसाधारण महत्त्व

व्यावसायिकांना विशेष रोजगार प्राप्त; दिवसेंदिवस नफ्यात घट

निफाड : विशेष प्रतिनिधी
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात गृहिणी बाजारात आलेल्या नवनवीन प्रकारच्या वस्तूंना प्राधान्य देत असल्या, तरी मात्र दिवाळीसाठी सिंधीच्या पानांपासून तयार होणार्‍या (केरसुणी) शिरई अर्थात झाडूला विशेष महत्त्व असून, या सणाला त्याच्या खरेदीला विशेष पसंती दिली जाते. केरसुणीला (झाडू) ‘लक्ष्मी’ म्हणून समजले जात असल्याने लक्ष्मीपूजनाला या केरसुणीला मोठा मान असतो. सिंधीच्या पानांपासून तयार करण्यात येणार्‍या या झाडूला (केरसुणी) दिवाळीत अनन्यसाधारण महत्त्व असल्याने व्यावसायिकांना या कालावधीत विशेष रोजगार
प्राप्त होतो.
श्रीमंतांपासून झोपडीत राहणार्‍या गरिबांपर्यंत सर्वजण दिवाळीत आवर्जून शिरई खरेदी करतात. यामुळे दिवाळी काळात केरसुणी तयार करणार्‍या कारागिरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. कधी कधी बाजारात विविध वस्तू आल्याने या झाडूला फारसे कुणी विचारत नसल्याने कारागिरांना रोजगाराचा प्रश्न भेडसावतो. सध्या विविध प्रकारच्या आधुनिक केरसुणींनी (झाडू) आपली ग्राहकांवर छाप पाडली असल्याने या पुरातन झाडूचे महत्त्व कमी झाले आहे.
पूर्वी घराघरांत असणारे झाडूचे महत्त्व यांत्रिक युगात दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. परिणामी, त्यामुळे ग्रामीण कारागिरांच्या रोजगारावर संक्रांत आली आहे. अनेक गावांमध्ये पूर्वीपासून सिंधी झाडाच्या पानांपासून झाडूनिर्मिती करण्याचा पारंपरिक व्यवसाय सुरू होता. मात्र, आता सिंधीची झाडेही दुर्मिळ झाल्याचे पाहावयास मिळते. सिंधी झाडाच्या दुर्मिळतेमुळे या झाडाच्या पानोळ्या मिळणे दुरापास्त झाले आहे. केरसुणीला ग्रामीण भागात आजही महत्त्व असले तरी सिंधीच्या झाडांची संख्या कमी असल्याने हा व्यवसाय करणारे आता बोटावर मोजण्याइतकेच राहिले असून, हा व्यवसाय शेवटची घटका मोजत आहे. परिणामी, केरसुणीनिर्मितीचा व्यवसाय करणार्‍या कारागिरांवर उपासमारीचा प्रसंग ओढवला आहे. या व्यवसायाकडे शासनाकडूनही दुर्लक्ष होत असल्याने घराघरांत आढळणारी व ‘लक्ष्मी’ म्हणून ओळखली जाणारी ही केरसुणी आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. केरसुणी घरात आणल्यानंतर आजही ग्रामीण भागात हळद-कुंकू लावून त्याची पूजा करण्याची परंपरा कायम असल्याचे पाहावयास मिळते. विशेषतः दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी केरसुणी खरेदी करण्यात येते. अन्य दिवसांसाठी आधुनिक झाडूंचा वापर केला जात असल्याने व्यवसायास अवकळा आल्याचे झाडू विक्रेते शंकर जाधव (नैताळे)
यांनी सांगितले.

ग्रामीण भागात ज्या झाडूची पूजा होते, त्याचा वर्षभर घरात वापर होतो. गतवर्षी एका झाडूसाठी 50 ते 70 रुपये दर होता, यंदाही हाच दर कायम आहे. मात्र, याच्या बांधणीसाठी लागणारी दोरी व अन्य साहित्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात नफ्याला दुष्ट लागून पदरी तोटा पडत आहे.
-लक्ष्मण जाधव, केरसुणी विक्रेते, नैताळे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *