निफाडचा पारा 7 अंशांवर; तालुका गारठला

वाडी-वस्तीवर पेटू लागल्या शेकोट्या

निफाड : तालुका प्रतिनिधी
गेल्या आठवड्यापासून तालुक्यातील तापमानात मोठी घट होत असून, मंगळवार, दि. 18 रोजी 6.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेलेल्या तापमानात 1 अंशने वाढ झाली असून, काल बुधवारी (दि. 19) निफाड कृषी संशोधन केंद्रावर 7 अंश सेल्सिअस तर चांदोरी येथे 6.8 अंश आणि सुकेणा 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने अवघा तालुका थंडीने गारठू लागला आहे. पुढील काही दिवस थंडीच्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.
यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाची सुरू झालेली हजेरी ऑक्टोबर पर्यंत कायम राहिल्याने हातात आलेली पिके वाया गेली, तर भरवशाच्या असणार्‍या द्राक्षवेलींना यावर्षी फळधारणा झाली नाही. तर जेथे द्राक्षवेलींना थोडेफार घड आले, त्यांना आता या प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागत आहे.
वाढत्या थंडीमुळे द्राक्षवेलींची अन्नद्रव्य तयार करण्याची प्रतिक्रिया मंदावत असून, मुळ्या चोकअप होणे, वेलींवर भुरी, डाऊनी, करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे द्राक्षपीक वाचविण्यासाठी शेतकरी भल्या पहाटे द्राक्षबागेत, चिपाटे पेटवून उष्णता तयार करू लागले असून, द्राक्षवेलींच्या मुळ्या चोकअप होऊ नये यासाठी ठिबकद्वारे पाणी देत आहेत. सध्या तालुक्यात लाल कांदा लागवड तर उन्हाळ कांदा रोप ऐन बहरात आले असून, ही वाढती थंडी कांदा पिकाबरोबरच गहू, हरभरा पिकासाठी लाभदायक ठरत आहे. मात्र, थंडीत अधिक वाढ झाली तर कांदापात करपणे, गहू आडवा पडणे, असे प्रकार वाढीस लागण्याची शक्यता अधिक आहे. तालुक्यात सर्वाधिक थंडीचा माहोल तालुक्याच्या गोदाकाठ भागात दिसून येत आहे.आणि विशेष म्हणजे या परिसरात उसाचे सर्वाधिक क्षेत्र असल्याने ऊसतोडणी कामगार मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. साहजिकच वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी वाडी, वस्तीवर शेकोट्या पेटविल्या जाऊ लागल्या आहेत.
महाबळेश्वर, कुलू-मनालीपेक्षाही कुल कुल जिल्ह्याचा कॅलिफोर्नियामधून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात दरवर्षी थंडी नवनवे विक्रम प्रस्थापित करीत असते, मात्र दरवर्षी ही थंडी डिसेंबर अखेर आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस पडते. यावर्षी मात्र नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीचा माहोल सुरू झाल्याने डिसेंबरअखेर थंडी वजा सेल्सिअसमध्ये नोंदविली जाईल की काय, अशी शंका घेतली जात आहे. कारण पाच वर्षांपूर्वी तापमानाची नोंद वजामध्ये झाली होती. त्यावेळी पाण्याचे बर्फात रूपांतर तर पिकांची पाने करपली होती. द्राक्षबागेत काही ठिकाणी बर्फाची चादर पसरली होती. त्यामुळे अशी परिस्थिती यावेळी निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त
करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *