आठ महिन्यांत तीन जणांचे प्राण घेतले, अनेकांना जखमी केले
दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यासह इतर ठिकाणी बिबट्यांची संख्या वाढत असून, मानवावरील हल्ले व ग्रामीण भागातील पशुधनाचे नुकसान यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगण्यात येत असून, बिबट्याने आठ महिन्यांत तीन जणांचे प्राण घेतले. काहींना जखमी केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकर्यांना शेतीकाम करण्यास मोठा अडथळा निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे शेतीकामे मार्गी लावण्यास व्हिलन होत असून, त्यात मजूरवर्गात बिबट्याची धाकधूक वाढल्याने मजूरवर्ग कामास नकारघंटा दर्शवित आहे.
दिंडोरीसह लखमापूर, ननाशी, ठेपणपाडा चाचडगाव, मोहाडी, खेडगाव, निळवंडी, हातनोरे, मडकीजांब, वनारवाडी, जांबुटके, पालखेड बंधारा, कोराटे, वाघाड या ठिकाणी बिबट्याचे हॉटस्पॉट बनले आहे. आता तर भरदिवसा बिबट्याचे मानवाला दर्शन घडत आहे. अधिवास सोडून बिबट्या शहरी भागातसुद्धा दाखल झाला आहे. मागील दोन महिन्यांत बिबट्यांनी पाच जनावरांवर हल्ले करत ठार केले. शहर व परिसरात बिबट्याच्या नियमित दर्शनाने दिंडोरीकरही भयभीत झाले आहेत.
सद्यपरिस्थिती पाहता मानव-बिबट्या संघर्ष निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात तर बिबट्याचा प्रश्न गंभीर आहे. दररोज कुठेना कुठे बिबट्याचा हल्ला होत आहे. मानव -बिबट्या संघर्ष आणखी निर्माण होत आहे. त्यावर ठोस धोरण करून हा संघर्ष होणार नाही, अशी मागणी या विषयातील जाणकार करत आहेत. भविष्यात यातून आणखी अपघात होण्याचा धोका असल्याने त्वरित ठोस निर्णय घेण्याची मागणी होत आहे. मानव व बिबटे संघर्ष केवळ दिंडोरी परिसरातील नसून, जिल्ह्यात अनेक भागांत पोहोचला आहे. खरंतर वनक्षेत्र घटल्याने आणि सिंचन सुविधा वाढल्याने उसाचे क्षेत्र वाढल्याने बिबटे वनक्षेत्रातून उसामध्ये स्थिरावले आहेत. उसामध्ये हक्काचा निवारा, मुबलक पाणी आणि शेतकर्यांचे पाळीव पशुधन, मोकाट कुत्री यामुळे बिबट्यांना खाद्य मिळत राहते. त्यामुळे बिबट्याच्या कित्येक पिढ्या उसामध्ये वाढत आहेत. त्यामुळे वनविभागाने ज्या ठिकाणी बिबट्याचे वास्तव्य आहे, त्या ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्यांनी
केली आहे.