राजकीय गणिते बदलली, जागा राखण्याचे आव्हान

प्रभाग क्रमांक 19

नाशिकरोड परिसरात एकूण सहा प्रभाग असून, त्यांपैकी पाच प्रभाग चार नगरसेवकांचे आहेत. मात्र. नाशिकरोडचा पूर्व भाग समाविष्ट असलेला प्रभाग क्रमांक 19 हा केवळ तीन नगरसेवकांचा आहे. या प्रभागाचा मोठा भाग देवळाली विधानसभा मतदारसंघात असल्याने येथील राजकीय समीकरणे नेहमीच वेगळी, गुंतागुंतीची आणि बदलणारी असल्याचे दिसून येते. शिवसेना एकसंघ असताना मागील निवडणुकीत या प्रभागातून जयश्री खर्जुल आणि संतोष साळवे हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते, तर पंडित आवारे भाजपकडून विजयी झाले होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीत मात्र संपूर्ण गणित बदलले आहे. जयश्री खर्जुल या ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात गेल्या. संतोष साळवे आजही शिवसेना ठाकरे गटात आहेत.
या प्रभागात तीन वेगवेगळ्या पक्षांचे तीन नगरसेवक निवडून आल्यामुळे आगामी निवडणुकीत या तिन्ही पक्षांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी अधिक कसरत करावी लागणार आहे. यामुळेच या प्रभागात कोण बाजी मारते आणि कोण पराभूत होते याबद्दल मतदारांत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, विरोधी पक्षांचे उमेदवारही प्रबळ असल्याने स्पर्धेत आणखी रंगत वाढली आहे.
सर्व पक्षांची सक्रियता
प्रभाग 19 चा बराचसा भाग देवळाली मतदारसंघात येत असल्याने या मतदारसंघातील आमदार सरोज आहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) यांच्या दृष्टीनेही हा प्रभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडूनही यावेळी उमेदवार उभा करून जागा जिंकण्याचे प्रयत्न होणार आहेत. शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, भाजप, आरपीआय, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या सर्व पक्षांची येथे सक्रियता मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिक पातळीवरील नाराजी, गटबाजी आणि अंतर्गत राजकारण यामुळे हे समीकरण आणखी क्लिष्ट होणार आहे. मनसे- शिवसेना ठाकरे गटाची युती जरी निश्चित मानली जात असली, तरी या प्रभागात मनसेचे अस्तित्व कमी असल्याने प्रत्यक्ष लढत ठाकरे गटालाच द्यावी लागेल, अशी शक्यता आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आपले नशीब आजमावण्यासाठी या प्रभागात मैदानात उतरण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या अनेक निवडणुकांत या प्रभागात नेहमीच बदल होताना दिसले आहेत. एकाच पक्षाने सलग वर्चस्व राखणे येथे कठीण मानले जाते. त्यामुळे आगामी निवडणुकीतही प्रभाग 19 हा नात्या-गोत्यांचा, राजकीय उलथापालथ घडवणारा प्रभाग ठरणार, हे निश्चित! कोणता पक्ष आपले अस्तित्व टिकवतो, कोण नवीन गणित रचतो आणि कोण मतदारांची मने जिंकतो यावरच निकाल ठरणार आहे. प्रभाग 19 हा तीन सदस्यांचा आहे. मागील निवडणुकीत सर्वसाधारण गटातून पंडित आवारे, ओबीसी महिला गटातून जयश्री खर्जुल, तर अनुसूचित जाती गटातून संतोष साळवे यांनी प्रतिनिधित्व केले होते.
आरक्षणाने बदलले चित्र
यंदाच्या निवडणुकीत प्रभागातील आरक्षण पद्धती बदलली असून, महिला नेतृत्वाचा प्रभाव अधिक ठळकपणे जाणवत आहे. पंडित आवारे व जयश्री खर्जुल यांच्या जागा कायम आहेत. अनुसूचित जाती गटाची जागा यंदा अनुसूचित जाती महिला राखीव झाल्याने माजी नगरसेवक संतोष साळवे यांना निवडणुकीत उतरणे शक्य होणार नाही. यामुळे त्यांनी कन्या रूचिरा हिला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभागात महिलाराज अधोरेखित होत असून, निवडणुकीत महिला उमेदवारांमध्ये चुरस वाढण्याची दाट शक्यता आहे.

प्रभागातील समस्या

• नाशिकरोड पूर्व भागात रेल्वे तिकीटघर सुरू करावे.
• सिन्नर फाटा येथून शहर व जिल्ह्याबाहेर बससेवा सुरू करावी.
• अद्ययावत क्रीडांगण, अभ्यासिका, व्यायामशाळा सुरू कराव्यात.
• महापालिकेतर्फे इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत माध्यमिक शिक्षणाची सोय करावी.
• सिन्नर फाटा, एकलहरे रोड चौफुलीवर वाहतूक कोंडीचे नियोजन करावे.

इच्छुक उमेदवार

पंडित आवारे, जयश्री खर्जुल, रुचिरा संतोष विशाखा साळवे, हरिष भडांगे, शीतल कन्हैया साळवे, शिवा भागवत, भारती ताजनपुरे, राहुल ताजनपुरे, योगेश भोर, बाजीराव भागवत, स्वाती संतोष वाकचौरे, शिवाजी भोर, शोभा आवारे, वैभव अरिंगळे, वसंत अरिंगळे, राजश्री जाधव, मीनाक्षी शिरोळे, पूर्णिमा घोलप, नाना शिंदे, साहेबराव खर्जुल, सीमा विनायक पगारे, गोकुळ नागरे, प्रशांत बारगळ, चंद्रभान ताजनपुरे.

प्रभागाची व्याप्ती

गोरेवाडी, हिवाळेवाडी, जाधववाडी, शास्त्रीनगर, समर्थनगर, भोर मळा, अस्वले व अरिंगळे मळा, नेहे व भालेराव मळा, अत्रिनंदन सोसायटी, चाढेगाव, चेहेडी गावठाण, चेहेडी पंपिंग रोड, नदीपर्यंत परिसर, विष्णूनगर, स्टेशनवाडी, सिन्नर फाटा, गणेशा व्हॅली, गजानन पार्क, बनकर मळा, प्रसादधुनीजवळील परिसर, गाडेकर व गिते मळा आदी परिसर.

प्रभागात झालेली कामे

• प्रभागात भव्य एसटी बसस्थानक.
• महाराणी येसूबाई उद्यान.
• तान्हाजी मालुसरे क्रीडांगण.
• गोरेवाडी व सामनगाव रोडवरील दोन जलकुंभांचे काम प्रगतिपथावर.
• नवीन जलवाहिन्या टाकल्या जात आहेत.
• प्रभागातील बारा उद्यानांमध्ये ग्रीन जिम व मुलांसाठी खेळणी बसवली.
• ड्रेनेजचे 80 टक्के काम पूर्ण.
• कॉलनी रोड, चाढेेगाव-चेहेडी, गोरेवाडी, संभाजीनगर, अरिंगळे मळा, ओढा रोड आदी ठिकाणी रस्त्यांचे काँक्रीटीकरण व डांबरीकरण झाले आहे.
• सामनगाव रोड, अस्वले मळा रोड आणि बस डेपो रोडची महत्त्वाची कामे सुरू आहेत.

2011 नुसार लोकसंख्या

• लोकसंख्या ः 37,712
• अनुसूचित जाती ः 9,842
• अनुसूचित जमाती ः 2,306

विद्यमान नगरसेवक

संतोष  साळवे,

                                                      जयश्री खर्जुल,

                                                       पंडित आवारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *