आज ‘सदानंदाचा येळकोट…’

नाशिक : प्रतिनिधी
‘सदानंदाचा येळकोट… येळकोट, येळकोट जय मल्हार…’ अशा जयजयकारात बुधवारी चंपाषष्ठी साजरी होणार आहे. त्यानिमित्त श्री खंडेरायाचा जागर होणार आहे.शहरातील खंडोबा मंदिरे विद्युत रेषणाईने सजली आहेत.
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. सहा दिवसांचा उत्सव मोठ्या प्रमाणात व अतिशय भक्तिभावाने साजरा करण्यात येतो. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या खंडोबाच्या मंदिरांत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच आज चंपाषष्ठीनिमित्त विधिवत पूजा, कुलाचाराप्रमाणे तळी भरण्यात येणार आहे. बेल, दवणा, चाफ्याची आणि झेंडूची फुले वाहिली जातात. बेल भंडारा उधळण, महाआरती, महानैवेद्य दाखवत खंडोबाची उपासना केली जाणार आहे. पाच दिवस उपवास केले जातात. ते उपवास आज सोडण्यात येतात. खंडोबाला वांग्याचं भरीत, रोडगे, कांदापात आणि पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवण्यात येऊन यथासांग पूजा करण्यात येते. खंडोबाचे वाहन असलेल्या अश्व आणि श्वान यांनाही नैवेद्य
देण्यात येतो.
चंपाषष्ठीनिमित्त घरोघरी पारंपरिक पद्धतीने तळीभरण, विधिवत पूजन आणि कुळधर्म-कुळाचाराचे पालन करून खंडेरावास नैवेद्योपचार अर्पण केले जाणार आहेत. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी स्थापण्यात आलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या घटांचे उत्थापनही करून गावोगावी ग्रामदैवत खंडोबाचा यात्रोत्सव बहरणार आहे. शहरात गोदाकाठ, पेठरोड, देवळाली कॅम्प, मालेगावच्या चंंदनपुरी, ओझर आदी ठिकाणी सालाबादप्रमाणे यंदाही पारंपरिक थाटात यात्रोत्सव, पूजाविधी आणि चंपाषष्ठीचा उत्सव साजरा
होणार आहे.
गोदाकाठच्या श्री खंडेराव महाराज मंदिरासह शहर-जिल्ह्यातील मंदिरांना रोषणाई करण्यात आली आहे. पेठरोडवरील पंचवटीचा मल्हार राजा देवस्थान ट्रस्टतर्फे दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. वडनेर दुमाला नॉर्थ रेंज रोड येथील पाळदे मळ्याशेजारील श्री खंडेराव महाराज मंदिरात बुधवारी (दि.26) पूजन आणि दर्शन घेता येईल. त्यानंतर सायंकाळी 7 वाजेपासून ते भाविकांच्या आगमनापर्यंत महाप्रसाद सुरू राहणार आहे.
गेल्या 40 वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, दरवर्षी चार-पाच हजार भाविक दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. श्री खंडेराव महाराजांचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मधुकर पोरजे यांनी
केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *