नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा थंडीचा कडाका तीव्र झाला आहे. मंगळवार, दि. 9 डिसेंबर रोजी शहरात किमान तापमान 9.3 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 28.6 अंश नोंदविण्यात आले. तापमानातील झपाट्याने घसरण जाणवत असल्याने सर्दी, खोकला, श्वसन त्रास अशा आरोग्य समस्या वाढू लागल्या आहेत.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात ङ्गसेन-यारफ आणि ङ्गदिट-वाहफ ही दोन चक्रिवादळे तयार झाली होती. त्यानंतरही राज्यात अपेक्षेपेक्षा जास्त थंडीचा अनुभव आला. आता मात्र 20 डिसेंबरपर्यंत थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. उत्तर भारतातील थंड वारे ईशान्येकडून थेट महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत. दक्षिणेकडील हंगामी मान्सूनचा प्रभाव संपल्यामुळे या थंड वार्यांना कोणताही अडथळा राहत नाही. याचबरोबर जेट स्ट्रीमचा पट्टा 39 अंश वरून 22 अंश अक्षवृत्तापर्यंत दक्षिणेकडे सरकल्यामुळे गारठा अधिक जाणवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.