सिंहस्थात फिरती वैद्यकीय पथके

डॉ. प्रवीण गेडाम : सिंहस्थ आढावा बैठक

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणार्‍या हजारो भाविकांना तत्काळ आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी सिंहस्थ कालावधीत फिरती वैद्यकीय पथके मुख्य ठिकाणी तैनात राहणार असून, त्यामुळे भाविकांना सुलभपणे आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, अशा पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात मंगळवारी (दि.9) सिंहस्थ कुंभमेळा कामांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील (ग्रामीण), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, लेखा व कोषागारे विभागाचे सहसंचालक बी. डी. पाटील, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. योगेश चित्ते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, कुंभमेळ्यानिमित्त देश-विदेशातून भाविक येतील. त्यांच्यासाठी अद्ययावत, दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी. त्याबरोबरच रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, अतिदक्षता कक्ष कार्यान्वित ठेवावा. त्यासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी आणि अन्य मनुष्यबळ गुणवत्तापूर्ण असावे. साधुग्राम, घाट परिसरात दोन्ही बाजूला वाहनतळ, रेल्वे स्थानक, बसस्थानक, आखाड्याच्या ठिकाणी, पर्यटनस्थळांच्या तसेच पोलिस, आरोग्यसेवक, स्वच्छता कर्मचारी आदी अत्यावश्यक सेवेच्या कर्मचार्‍यांच्या निवासाच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. तसेच, पोलिसांच्या मदतीने रुग्णालयांपर्यंतचा मार्ग निश्चित करावा. कुंभमेळा आयुक्त श्री. सिंह यांनी कुंभमेळा कालावधीत द्यावयाच्या आरोग्यसेवेबाबत मार्गदर्शन केले. महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून, तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे, आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. चित्ते यांनी जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून देण्यात येणार्‍या आरोग्यसेवेची सविस्तर माहिती दिली. तसेच कुंभमेळ्याच्यादृष्टीने करण्यात येत असलेल्या नियोजनाचे सादरीकरण केले.

रुग्णालयाच्या माहितीचे संकलन

सद्यस्थितीत शहरात असलेल्या शासकीय, निमशासकीय, खासगी रुग्णालये, तेथे उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवा, उपलब्ध यंत्रसामग्री यांचीही माहिती संकलित करून कुंभमेळ्यासाठी वाढीव आरोग्यसेवेचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच, कुंभमेळ्यात सेवेसाठी येणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांची निवासव्यवस्था अद्ययावत ठेवण्यात येणार आहे.

अत्यावश्यक सेवांचे सूक्ष्म नियोजन

कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक येणार असल्याने अत्यावश्यक सेवा असणार्‍या आरोग्यसेवेचे सूक्ष्म पातळीवर नियोजन करण्यात येणार असून, भाविकांना तत्काळ आरोग्यसेवा जागेवरच उपलब्ध व्हायला हवी, या दृष्टिकोनातून नियोजन करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *