नामपूरला कांद्याला विक्रमी 3151 रुपयांचा भाव

निर्यात खुली केल्यामुळे देशांतर्गत मागणी वाढली

नामपूर : वार्ताहर
गेल्या दोन दिवसांपासून बांगलादेश निर्यात सुरू झाल्यामुळे कांद्याचे भाव दुपटीने वाढले आहेत. नामपूर येथील मोसम खासगी कृषी बाजार समितीत लाल कांदा 3151 रुपये दराने विक्री झाला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कांद्याला अतिशय कमी बाजारभाव मिळत होता. उत्पादनखर्चसुद्धा निघत नव्हता. कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. कांद्याची लागवड करावी की नाही, अशा चिंतेत शेतकरी अडकला होता. अनेक शेतकर्‍यांनी यंदा शेती पडीक ठेवली आहे. मात्र, कांदा लागवड केलेली नाही. आता शेतकरी बांधवांकडे उन्हाळी कांदा शिल्लक राहिलेला नाही. उन्हाळ कांदा खराब झाला आहे. पावसाळी कांदा आता बाजारात येत असून, सरकारने निर्यात खुली केल्यामुळे देशांतर्गत कांद्याला मागणी वाढली आहे. परिणामी, बाजारभाव वाढला आहे. नामपूरमधील मोसम खासगी मार्केटमध्ये उन्हाळी व लाल कांद्याची आवक चांगली होती. मळगाव येथील शेतकरी वसंत बाबूलाल मासूळ यांची दोन वाहने 3151 रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाल्याने त्यांचा बाजार समितीतर्फे सचिनभाऊ मुथा यांनी सत्कार केला. आगामी काळात कांद्याची निर्यात सुरू राहिल्यास बाजारभाव चांगले राहतील, अशी प्रतिक्रिया कांदा व्यापारी पिंटूशेठ निकम यांनी व्यक्त केली आहे.

सरकारला हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. शेतकर्‍यांकडे आता कांदाच राहिलेला नाही. उन्हाळी कांदा बाजारात येण्यास अजून किमान पाच महिने बाकी आहेत. मागील सहा महिन्यांपूर्वी जर निर्यातबंदी सुरू राहिली असती, तर सर्व कांदा उत्पादक शेतकर्‍यांना फायदा झाला असता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने निर्यातीचा निर्णय घेऊन कांदा उत्पादकांची फसवणूक करण्याचा प्रकार आहे.
-दीपिका चव्हाण, माजी आमदार

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *