मोहाडीत गणेशगाव वस्तीला दूषित पाणीपुरवठा

महिलांची तक्रार; दोन महिने पाणीपुरवठा
मात्र बारा महिन्यांची पाणीपट्टी

दिंडोरी : प्रतिनिधी
मोहाडी ग्रामपंचायतींतर्गत असणार्‍या गणेशगाव वस्तीवर अनेक वर्षांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. गणेशगावातील रहिवाशांनी मोहाडी ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रार करूनही फक्त आश्वासन देण्यात येत असल्याचा आरोप येथील महिलांकडून होत आहे.
गणेशगावात अंदाजे एक हजार लोकवस्ती असून, मोहाडी ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा केला जातो; परंतु हा पाणीपुरवठा महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाकडून करण्यात येतो. हे पाणी गणेशगाव येथील विहिरीत साठवून त्यानंतर गणेशगाव येथील पाण्याच्या टाकीत साठा करून नंतर ग्रामस्थांना याचा पुरवठा करण्यात येतो. विहिरीत साठवलेले पाणी दूषित होते. हेच दूषित पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी अनेक दिवसांपासून दिले जात आहे. याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे लेखी व तोंडी तक्रारी करूनही मोहाडी ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे. मोहाडी ग्रामपंचायत वर्षातून दोन महिनेच गणेशगावला पाणीपुरवठा करते आणि बारा महिन्यांची पाणीपट्टी ग्रामस्थांकडून वसूल करते, असे महिलांनी सांगितले. इतर वेळा पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांना विहिरीतून बादली किंवा डब्याच्या सहाय्यानेे पाणी भरावे लागते. त्यामुळे ग्रामस्थ, लहान मुले, जनावरांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
गणेशगाव येथील संतप्त महिलांनी व राघोजी क्रांती सेनेतर्फे मोहाडी ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गणेशगावचा पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडविला नाही तर ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी छाया गोतरणे, उषा गांगोडे, स्वप्ना नेहरे, निर्मला वाघ, आशा गांगोडे, प्रीती टोंगारे, लीला वाघ, नंदा वाघ, सिंधू कोरडे, शांता ब्राह्मणे, गौरी जाधव, पुष्पा खुताडे, सुमन पागे, आशा साबळे, रूपाली मिरके, शिला कणसे, पार्वती राथड, मोहिनी सापटे, दुर्गा वाघमारे, सरळ वाघमारे, राघोजी क्रांती सेना संस्थापक सोमनाथ वतार, सोनू काठे व ग्रामस्थ उपस्थित होते.

माझ्या लग्नाला नऊ वर्षे झाली असून, मी व माझे कुटुंब येथील विहिरीचे पाणी पितो. या विहिरीतून दूषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत अनेक वेळा मोहाडी ग्रामपंचायतीला कळविले. मात्र, अधिकारी आम्हास सांगतात की, आम्ही शुद्ध पाणीपुरवठा करतो. याप्रकारे आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. – सुवर्णा पागे, गणेशगाव

विहिरीतील कचरा पाण्यात मिसळतो. त्यामुळे पाणी दूषित होते. नंतर त्याच पाण्याचा पुरवठा ग्रामस्थांना केला जातो. हा पाणीपुरवठा फक्त उन्हाळ्यात एक ते दोन महिनेच केला जातो. मात्र, पाणीपुरवठ्याचे बिल बारा महिन्यांचे दिले जाते. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी पाणीपट्टी थकवली आहे. विहिरीतील वीजपंप कधी जळाला तर बादली किंवा डब्याच्या सहाय्याने पाणी भरावे लागते. – संगीता सापटे, गणेशगाव

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *