इच्छुक उमेदवारांचे वृक्षप्रेम आले उफाळून
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम परिसरातील तब्बल 1,800 झाडांची तोड करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडताच नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमी संघटना, नागरिक तसेच विविध राजकीय पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. तपोवन परिसराचा पर्यावरणीय समतोल धोक्यात येऊ नये, ही नागरिकांची मागणी असली, तरी या विषयाला आता राजकीय स्वरूप अधिकाधिक मिळू लागले आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही इच्छुक उमेदवारांनी या प्रकरणाचा राजकीय ब्रँडिंगसाठी वापर सुरू केला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली मोजक्या कार्यकर्त्यांसह आंदोलनस्थळी पोहोचून स्वतःला चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न अनेकांकडून सुरू आहे. प्रसंग कोणताही असो, त्यातून स्वतःची पोळी भाजून घेण्याचे राजकीय कौशल्य स्थानिक नेत्यांकडे नेहमीच पाहायला मिळते. तपोवनच्या आंदोलनाने हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. याचदरम्यान
सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपूर्वी मनपा निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्यानंतर निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता अधिकच वाढली आहे. परिणामी संभाव्य उमेदवारांकडून जनसंपर्क वाढविणे आणि सतत लोकांच्या नजरेत राहणे, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
तपोवनाचा मुद्याद्वारे स्वतःला जनतेचा आवाज म्हणून प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे. विशेष म्हणजे, आठ वर्षांनंतर होणार्या महापालिक निवडणुकांमुळे शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. नवे चेहरे, नव्या महत्त्वाकांक्षा आणि बदललेले पक्षीय आकडे यामुळे स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे प्रत्येक इच्छुक उमेदवार आपली प्रतिमा मजबूत करण्यासाठी कोणतीही संधी हातची जाऊ देत नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या झाडांविषयी प्रेमाला अचानक भरतं आलं आहे.
राजकीय गणिते
एकूणच तपोवनातील वृक्षतोड हा पर्यावरणीय प्रश्न असला, तरी त्यावरून सुरू झालेली हालचाल आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीचा महत्त्वाचा भाग बनली आहे. पर्यावरणाची काळजी किती आणि राजकीय गणित किती, यावर अजूनही नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.