नाशिक : प्रतिनिधी
तपोवनातील साधुग्राम परिसरातील वृक्षतोडीला विरोध होत असून, सतत आंदोलन सुरू आहे. या पाश्वर्र्भूमीवर महापालिकेच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीची मोहीम राबविण्याची तयारी केली आहे. यासाठी हैदराबाद येथून घेतलेली तब्बल 15 हजार झाडे कंटेनरद्वारे शहरात आणली जाणार आहेत. दरम्यान, ही झाडे लावण्यासाठी महापालिका जागेचा शोध घेत आहे.
ही झाडे नेमकी कुठे लावली जाणार, याकडे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. मंत्री महाजन यांनी तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या मोबदल्यात 15 फूट उंचीची 15 हजार झाडे शहरात लावली जातील, असे जाहीर केल्यानंतर ही प्रक्रिया गतिमान करण्यात आली.
कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार हैदराबादहून येणारी 15 हजार झाडे लावण्याची जबाबदारी मनपावर राहणार आहे. एवढ्या प्रमाणात झाडे लावण्यासाठी जागेचा शोध सुरू असल्याची माहिती मनपा उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली. दरम्यान, तपोवन येथे साधुग्रामच्या जागेवरील झाडे तोडण्यासाठी नागरिकांचा विरोध वाढतो आहे. परिणामी महापालिका प्रशासनाची कोंडी झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.