ज्येष्ठ नागरिकाची 19 लाखांची फसवणूक

संशयितांच्या मुसक्या आवळल्या

सिडको : विशेष प्रतिनिधी
कमी व्याजदरात कर्ज मिळवून देतो आणि कमी किमतीत फ्लॅट खरेदी करून देतो, असे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 19 लाखांची फसवणूक करणार्‍या दोन संशयितांना अंबड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 18 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
फिर्यादी ज्येष्ठ नागरिकांनी 4 डिसेंबर रोजी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयितांनी कमी व्याजदराच्या कर्जाचे आणि कमी किमतीत फ्लॅट मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांनी फिर्यादीकडून कोर्‍या धनादेशावर सही घेतली. नंतर तो धनादेश सोनाराच्या खात्यात वटवून संशयितांनी सोनाराकडून तब्बल 19 लाखांचे सोने घेतले आणि पसार झाले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्येष्ठ पोलीस निरीक्षक जग्विंदरसिंग राजपूत आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन खैरणार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक झनकसिंग घुनावत, अंमलदार मयूर पवार, केशव ढगे, फरीद इनामदार, सचिन वाघ आणि सुवर्णा सहाणे, असे विशेष पथक तयार करण्यात आले होते.
मिळालेल्या फुटेजवरून बातमीदारांच्या मदतीने संशयितांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर पथकाने संशयित लपून बसलेल्या ठिकाणी छापा घालून परवेज अनिस अन्सारी (वय 37, रा. प्लॉट क्रमांक 30, जय मल्हार कॉलनी, वडाळा) आणि पंकज निवृत्ती वाजे (वय 34, रा. रो-हाउस क्रमांक 5, शिवाजीनगर, सातपूर) यांना अटक केली. अंबड पोलिसांनी संशयितांकडून फिर्यादींच्या रकमेतील खरेदी करण्यात आलेले 134.980 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कॉइन आणि वेढणी, गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल आणि एक मोबाईल असा एकूण 18 लाख 96 हजार 442 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस तपास करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *