विंचूर : प्रतिनिधी
आजच्या युगात माणुसकी व प्रामाणिकपणा अभावानेच दिसतो. मात्र, काही लोक आजही प्रामाणिकपणे वागून समाजासमोर आदर्श निर्माण करतात. येथील रिक्षाचालक चंद्रकांत सूर्यवंशी यांचे आठ दिवसांपूर्वी पाच हजार रुपये हरवले होते. मात्र, त्यांच्या लक्षात येत नव्हते की, पैसे नेमके पडले कुठे? योगायोगाने दुसरे रिक्षाचालक गोकुळ ठुबे यांना येथील प्रभू श्रीराम चौकात एका कॅरीबॅगेत गुंडाळलेल्या अवस्थेत पाच हजार रुपये सापडले. ते त्यांनी आहे त्याच स्थितीत सांभाळून ठेवले व कोणी पैशांची शोधाशोध करत येईल, याची वाट पाहत दररोज खिशात बाळगत होते.
दरम्यान, आठ दिवसांनी चंद्रकांत सूर्यवंशी व गोकुळ ठुबे यांची येथील रिक्षा स्टँडवर भेट झाली. सूर्यवंशी यांनी माझे पैसे हरवल्याचे सांगितले. तेव्हा ठुबे यांनी पैसे किती होते? कशात होते? याची खातरजमा केली. सूर्यवंशी यांना पाच हजार रुपये परत करून प्रामाणिकपणा व माणुसकीचे दर्शन घडविले.