तपोवनातील वृक्षतोडीला हरित लवादाकडून ‘ब्रेक’

15 जानेवारीपर्यंत एकही झाड न तोडण्याचे निर्देश

नाशिक : प्रतिनिधी
तपोवनातील साधुग्राममधील झाडे तोडण्याचा वाद चिघळल्यानंतर महापालिका प्रशासनाला हरित लवादाने दणका दिला आहे. पुणे येथील हरित लवादाने झाडे तोडण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया राबविल्याशिवाय एकही झाड तोडू नये, असे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी पुढील वर्षी म्हणजेच 15 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे अ‍ॅड. श्रीराम प्रल्हादराव पिंगळे यांनी स्वतःच नाशिक महापालिका व इतरांविरुद्ध हरित लवाद (पश्चिम विभाग) पुणे यांच्याकडे वृक्षतोडीविरोधात याचिका दाखल केली होती. लवादाने शुक्रवारी (दि. 12) पारित केलेल्या अंतरिम आदेशात नाशिक महापालिकेने कायदेशीर प्रक्रिया राबविल्याशिवाय एकही झाड तोडू नये, असे म्हटले आहे.
साधुग्राममधील अठराशे झाडे तोडली जातील, असे समजताच नागरिक, पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्थांकडून महापालिका प्रशासनावर रोष व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, ही वृक्षतोड होऊ नये याकरिता अभिनेता सयाजी शिंदे यांनी तपोवनात भेट देत शासनाच्या भूमिकेला विरोध केला. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आंदोलनात उडी घेत ठराविक लोकांच्या फायद्यासाठी माइस हब व वृक्षतोड करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा शहरात पेटला आहे. यातच हरित लवादाने महापालिकेला फटकारल्याचे दिसते आहे. दरम्यान, लवादाच्या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे.

अहवाल सादर करण्याच्या सूचना
या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जानेवारी 2026 ला होणार आहे. तपोवनातील नेमकी परिस्थिती काय आहे याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *