अशोकनगर परिसरात वाहतूक कोंडीने वाहनधारक त्रस्त

नाशिक : प्रतिनिधी
सातपूर भागातील अशोकनगर येथील अशोकनगर भाजी मार्केट आणि अशोकनगर पोलीस चौकी येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सातपूर ते बारदान फाट्यापर्यंत याच मार्गाचा वापर होत असल्याने सातत्याने वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्थादेखील झाली आहे. गेल्या काही वर्षांत या भागात नागरी वस्तीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे वाहनांची संख्यादेखील वाढली असल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीमुळे अनेक वेळा अपघातांच्या घटनादेखील घडत आहेत. परिणामी, या परिसरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या मार्गावरील कार्बन नाका, शिवाजीनगर येथेदेखील प्रचंड वाहतूक कोंडी होते. नागरी वस्तीसह या भागात औद्योगिक वसाहत असल्याने कंपन्यांत जाणारी अवजड वाहने याच मार्गावरून जात असतात.त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत अधिकच भर पडते. सातमाउली परिसरातील रस्त्यावर औद्योगिक वसाहतीसमोर अवजड वाहने उभी करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी अधिक वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांकडून या मार्गावरील वाहतूक कोंडीसंदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

अशोकनगर भागात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे पादचार्‍यांचीदेखील अडचण होते. सण-समारंभ असल्यास परिसरातील रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. इतकेच नाही, तर रोजसुद्धा या मार्गावर वाहतूक कोंडी असते. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात वाहतूक कोंडी होत असताना मनपा प्रशासनानेेयाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. मात्र, या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी रिंगरोड या भागात करत नागरिकांना दिलासा द्यावा.
-वृषाली सोनवणे, उपमहानगरप्रमुख (शिवसेना ठाकरे)

कायम या मार्गावर वाहतूक कोंडी असते. रस्ता दुपदरी करणे आवश्यक आहे. या मार्गावर वाहनांची वर्दळ असली तरी रस्ता तेवढाच असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
– कुणाल जाधव, नागरिक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *