जवान किशोर ठोके अनंतात विलीन; साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

पाटे परिसर ‘किशोर ठोके अमर रहे’च्या घोषणांनी दुमदुमला

काजीसांगवी : वार्ताहर
‘अमर रहे अमर रहे, किशोर ठोके अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमत चांदवड तालुक्यातील पाटे येथील वीर जवान किशोर ठोके यांना हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप दिला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले.
पाटे येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले किशोर ठोके (30)जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे कर्तव्य बजावत असताना त्यांना (दि. 12) हृदयविकाराने वीरमरण आले. त्यांचे पार्थिव रविवारी (दि. 14) चारला मूळगावी पाटे येथे दाखल झाले. ग्रामस्थांनी काही ठिकाणी श्रद्धांजली बॅनर लावले होते. तरुणांनी गावातून वीर जवानाच्या पार्थिवाची कोलटेक फाटा येथून मिरवणूक काढली. ‘अमर रहे किशोर ठोके अमर रहे,’ ‘भारतमाता की जय,’ ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला, तसेच अंतिम दर्शनासाठी पार्थिव राहत्या घरी ठेवताच आई, पत्नी वैशाली, भाऊ यांनी हंबरडा फोडला. उपस्थितांंचे मन हेलावून अश्रू वाहिले. अंतिम दर्शन घेऊन फुलांनी सजविलेल्या रथातून मिरवणूक काढली. ग्रामपंचायतीसमोरील महादेव मंदिराशेजारील शासकीय जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्यदलाच्या जवान व महाराष्ट्र पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना शेवटची मानवंदना दिली. पत्नी वैशाली यांना तिरंगा व वर्दी बहाल केली. यावेळी चांदवडचे तहसीलदार अनिल चव्हाण, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, पोलीस निरीक्षक कैलास वाघ, लेफ्टनंट कर्नल अरविंद, कमांडिंग ऑफिसर मराठा लाइट रेजिमेंट जिल्हा सैनिक बोर्ड ज्ञानेश्वर रोडे, तालुका सैनिक संघटनेचे वाल्मीक पवार, जिल्हा त्रिदल सैनिक संघटना अध्यक्ष अरुण गव्हाणे, जिल्हा वीरपत्नी, वीरमाता संघटनेतर्फे सरला शिरसाट, उपसरपंच उत्तम ठोके यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. यावेळी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व प्रहार जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, भाजपचे मनोज शिंदे, पंचायत समिती सदस्य नितीन गांगुर्डे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शांताराम ठाकरे, बाजार समिती संचालक राजेंद्र दवंडे, डॉ. अजय ठोके, अरुण न्याहारकर, संपतराव जाधव, माजी सभापती जयराम ठोके, साहेबराव ठोके आदी उपस्थित होते. भाऊ सागर याने भडाग्नी दिला.

जन्माआधीच वडिलांचे छत्र हरपले

कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वीर जवानाची पत्नी ही गर्भवती आहे. आपल्या बाळाला जन्माच्या आधीच वडिलांचे छत्र हरपल्याने मोठे दुःख झाले आहे. तरुण मुलगा गेला, ज्या भावामुळे आपले कुटुंब सुखी झाले, त्या भावाची अवस्थाही अतिशय खालावलेली बघायला मिळाली. उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू बघायला मिळत होते.

हवामानाशी झुंज देताना वीरमरण

शहीद किशोर ठोके जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हिमाचलच्या उंच, थंडगार व बर्फाच्छादित भागात 56 आरआर (राष्ट्रीय रायफल्स) अंतर्गत सेवेत होते. गेल्या 12 वर्षांपासून ते देशसेवेत कार्यरत होते. उबदार ठिकाणी येताना अचानक आलेल्या तीव्र हवामान बदलामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम झाला. श्वसनास त्रास वाढत गेला आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *