सिंहस्थ काळात रामकुंड परिसरातील गर्दीवर नियंत्रण शक्य
नाशिक : प्रतिनिधी
सोमेश्वर धबधबा (श्री बालाजी मंदिर) आणि नवश्या गणपती या परिसरात भव्यदिव्य गोदाघाट होण्यासाठी आमदार सीमा हिरे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. घाट उभारणीच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाल्याने आता लवकरच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. यामुळे नाशिकसह देशभरातून येणार्या भाविकांसाठी एक नवीन आणि भव्यदिव्य पर्यटन, तसेच धार्मिक स्थळ उपलब्ध होणार आहे. यामुळे सिंहस्थात रामकुंड परिसरात होणारी जीवघेणी भाविकांची गर्दी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे, अशी माहिती आमदार हिरे यांनी दिली आहे.
गंगापूर रोड परिसरातील सोमेश्वर धबधबा आणि नवश्या गणपती याठिकाणी रोज शेकडो भाविक येतात. पावसाळ्यात तर येथे येणार्या पर्यटकांची संख्या हजारोंच्या घरात जाते. चर्तुथी तसेच इतर धार्मिक उत्सवांच्या दिवशी नवश्या गणपतीला भाविकांची लक्षणीय गर्दी होत असते. पर्यटक आणि भाविकांसाठी या दोन्ही ठिकाणी भव्यदिव्य गोदाघाट व्हावा, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आ. हिरे यांच्याकडून शासनाकडे सततचा पाठपुरावा सुरू होता. दरम्यानच्या काळात हिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत याठिकाणी गोदाघाट होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
भाविकांसाठी आवश्यक सुविधा
आमदार सीमा हिरे यांच्या प्रयत्नांमुळे गोदाघाट उभारण्याचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. गोदाघाट उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे. यासाठी महामंडळाकडून 78 कोटी 26 लाख रुपयांचे अंदाजे इस्टिमेट तयार करण्यात आले आहे. महामंडळाकडून या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. गोदाघाटाबरोबरच याठिकाणी स्नानासाठी कुशावर्ताच्या धर्तीवर पाण्याची अनेक कुंडे, शौचालये, उद्यान, भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक असणारी सोयीसुविधांचीही उभारणी करण्यात येणार आहे. घाट उभारणीमुळे सिंहस्थ काळात भाविकांची गर्दी विभागली जाणार आहे. रामकुंड परिसरात होणारी जीवघेणी गर्दी निश्चितच कमी होणार असल्याचा विश्वास माहिती आमदार हिरे यांनी व्यक्त केला आहे.