अनिष्ट रूढींविरोधात सौभाग्याचे शपथपत्र

नाशिक जिल्हा परिषदेत ऐतिहासिक सामाजिक संदेश

नाशिक : प्रतिनिधी
एकल महिला (विधवा) यांच्यावरील अनिष्ट, अमानवी व अवैज्ञानिक रूढी कायमस्वरूपी नष्ट व्हाव्यात, या उद्देशाने नाशिक जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून राबविण्यात येणार्‍या जनजागृती अभियानाला एक ऐतिहासिक व प्रेरणादायी प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समाजपरिवर्तनाचा ठाम संदेश देणारा एक नवा आदर्श उभा राहिला आहे.
चांदशी (ता. नाशिक) येथील ग्रामपंचायत अधिकारी, महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना – जिल्हा शाखा नाशिकचे कोषाध्यक्ष तसेच राज्यस्तरीय आदर्श पुरस्कारप्राप्त पहिले ग्रामपंचायत अधिकारी विनोद अहिरे यांनी समाजासमोर सौभाग्याचे शपथपत्र सादर करत धाडसी पाऊल उचलले आहे. नाशिक जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्या उपस्थितीत अहिरे यांनी पत्नी राजश्री विनोद अहिरे व कुटुंबीयांसह शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर विधिवत प्रतिज्ञापत्र सादर केले.
या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या मृत्यूनंतर पत्नीने कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, पायातील जोडवे काढणे यांसारख्या अनिष्ट रूढींचे पालन करू नये. हा संकल्प केवळ वैयक्तिक न राहता, पत्नीवरील प्रेम, सन्मान व समानतेचा ठाम सामाजिक जाहीरनामा ठरला आहे. जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी हा भावनिक व मानवी दृष्टिकोन या कृतीतून प्रकर्षाने अधोरेखित झाला, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.
महिलाविरोधी रूढी व अंधश्रद्धांना ठाम नकार देणारे हे शपथपत्र कायदेशीर, नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे उदाहरण ठरत आहे. याप्रसंगी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संजय बाविस्कर, जिल्हा अध्यक्ष रवींद्र ठाकरे व जिल्हा सचिव माया मोढे उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत, समाजपरिवर्तनासाठी अशा धाडसी संकल्पांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.
ओमकार पवार यांनी या निर्णयाचे विशेष कौतुक करत, अशा उपक्रमांना प्रशासनाची पूर्ण साथ राहील, असे आश्वासन दिले.

Saubhagya's affidavit against undesirable customs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *