‘स्मार्ट नाशिक’मध्ये रात्रीस खेळ चाले…

रस्ते बनले कचर्‍याचे ‘ब्लॅक स्पॉट’

नाशिक : वाहिद बागवान

नाशिक शहराला ‘स्वच्छ आणि सुंदर’ शहराचा दर्जा मिळवून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असताना, दुसरीकडे काही बेजबाबदार नागरिकांमुळे शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेकडून दररोज सकाळी घंटागाडीची सोय उपलब्ध करून दिली जात असतानाही, अनेक नागरिक रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या कडेला कचरा फेकत असल्याचे चित्र आहे. यामुळे ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले असून, परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे.
मनपातर्फे प्रत्येक प्रभागात घंटागाड्यांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र, अनेक नोकरदार किंवा व्यावसायिक नागरिक सकाळी वेळेअभावी घंटागाडीत कचरा टाकू शकत नाहीत. हीच माणसे रात्रीच्या वेळी घरातला कचरा प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून दुचाकीवरून जाता-येता रस्त्याच्या कडेला, मोकळ्या भूखंडावर किंवा झाडांच्या आडोशाला फेकून देतात.

♦ दुर्गंधीचा विळखा : उघड्यावरील कचर्‍यामुळे परिसरात कुबट वास पसरत आहे, ज्यामुळे जवळ राहणार्‍या नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे.
♦ आरोग्याचा प्रश्न : साचलेल्या कचर्‍यावर डास आणि माशांचे प्रमाण वाढल्याने डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे.
♦ रस्त्यावरील श्वान : कचर्‍यात अन्नाचा शोध घेणार्‍या भटक्या कुत्र्यांमुळे वाहनधारकांचे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

स्वच्छता कर्मचार्‍यांची व्यथा
रस्त्यावर फेकलेला हा विखुरलेला कचरा उचलताना स्वच्छता कर्मचार्‍यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. आम्ही सकाळी घंटागाडी घेऊन प्रत्येक गल्लीत जातो, पण नागरिक तिथे कचरा न टाकता रस्त्यावर फेकतात. तो विखुरलेला कचरा हाताने उचलणे कष्टाचे आणि आरोग्यासाठी घातक ठरत आहे, अशी प्रतिक्रिया एका स्वच्छता कर्मचार्‍याने दिली.

रस्त्यांचे झाले ‘ब्लॅक स्पॉट’
शहरातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांच्या कोपर्‍यांवर आता कचर्‍याचे मोठे ढीग तयार झाले आहेत. विशेषतः नंदिनी नदीकाठचा परिसर, भाभानगर येथील शिखर सोसायटीच्या दोन्ही बाजूंचे मोकळे भूखंड, नागजी सिग्नल ते काठेगल्ली सिग्नल रस्ता, सारडा सर्कल ते मुंबई नाका रस्ता, गडकरी चौक ते सारडा सर्कल रस्ता, महात्मा फुले कलादालन परिसर, साठ फुटी रोड या व शहरातील अशा अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॉट आढळून येतात.

प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आता केवळ आवाहन न करता, रात्रीच्या वेळी गस्त घालून रस्त्यावर कचरा फेकणार्‍यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी.
– भूषण क्षिरे, इंदिरानगर

शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून, ते प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपल्या एका चुकीच्या सवयीमुळे संपूर्ण परिसराचे आरोग्य धोक्यात येते, याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे.
– इरफान शेख, भाभानगर

Night games are held in 'Smart Nashik'...

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *