66 किमी प्रकल्पासाठी एमएसआयडीसीकडून निविदा प्रसिद्ध
मुंबई : नाशिक शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी, तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यात वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एमएसआयडीसी) नाशिक परिक्रमा मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या बांधकामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. एमएसआयडीसीने 66 किमी लांबीच्या परिक्रमा मार्गाच्या बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. अंदाजे 3 हजार 200 कोटींहून अधिक खर्चाच्या या प्रकल्पाचे काम सात टप्प्यांत करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अंदाजे 8 हजार कोटी रुपये खर्चाचा नाशिक परिक्रमा मार्ग प्रस्तावित केला होता. मात्र निधी उभारण्याच्या आव्हानामुळे एमएसआरडीसीच्या अडचणी वाढल्या. शेवटी एमएसआयडीसीने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी उत्सुकता दर्शवली आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) या प्रकल्पाच्या कामासाठी एमएसआयडीसीला निधी देण्याचा निर्णय घेतला.
असा आहे परिक्रमा मार्ग
डीआरडीओ जंक्शन आडगाव, दिंडोरी रोड, कांबळे शिवार, राष्ट्रीय महामार्ग 884 पेठ गवळीवाडी, गंगापूर रोड, गोवर्धन त्र्यंंबक महामार्ग, बेलगाव ढगा, नाशिक- मुंबई महामार्ग विल्होळी रा.म.क्र.60 सिन्नर फाटा, आडगाव, असा हा परिक्रमा मार्ग आहे. हा मार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नाशिक शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुधारून वाहतूक कोंडीची समस्या निकाली निघणार आहे.
Nashik Parikrama Marg work to be done in seven phases