नगरपरिषदेत शिंदे गटाची ताकद वाढल; भाजपा, अजित पवार गट समसमान

नाशिक : प्रतिनिधी
नगरपरिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद चांगलीच वाढली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे दोनच आमदार असतानाही तब्बल पाच ठिकाणच्या नगराध्यक्षपदावर शिंदेसेनेने ताबा मिळविला.
निवडणूक जाहीर झाल्यापासून सुहास कांदे यांनी मनमाड आणि नांदगाव नगरपरिषदेत संपूर्ण ताकद पणाला लावली होती. त्याचा परिणाम म्हणून दोन्ही ठिकाणी कांदेंनी सत्ता मिळविली. तर सटाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केलेले नियोजन यशस्वी ठरले. भाजपाने जोर लावूनही पिंपळगाव बसवंत, चांदवड, ओझर या तीनच ठिकाणी नगराध्यक्षपद मिळविता आले. सटाण्यात उमेदवारी देताना केलेली चूक भाजपाला चांगलीच महागात पडली. सटाणा येथे भाजपाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या रूपाली कोठावदे यांच्याऐवजी माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. पण रूपाली कोठावदे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली.
तब्बल 5700 मते कोठावदे यांना मिळाली आणि भाजपाच्या उमेदवाराचा पराभव तीन हजार मतांनी झाला. त्यामुळे कोठावदेंच्या उमेदवारीचा फटका भाजपाला बसला. त्यात मंत्री दादा भुसे यांनी केलेल्या नियोजनाचाही फायदा झाला. त्र्यंबकेश्वरमध्येही शिंदे गटाच्या विरोधात भाजपाने मोठी ताकद उभी
केली होती.
परंतु, दादा भुसे हे येथे तळ ठोकून होते. त्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्येही शिंदे गटाने बाजी मारली. भगूरमध्ये मात्र, शिवसेनेची मोठी ताकद असूनही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आ. सरोज अहिरे यांनी उबाठा आणि भाजपाला सोबत घेत करंजकरांची सत्ता उलथवून टाकली. शिंदे गटाने इगतपुरीतही माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकरांच्या सत्तेला सुरुंग लावला.
शिंदे गटापाठोपाठ अजित पवार गटानेही जिल्ह्यात भगूर, सिन्नर आणि येवला या तीन नगरपरिषदांत वर्चस्व मिळविले. भाजपाचे ओझर, पिंपळगाव आणि चांदवड येथे नगराध्यक्ष निवडून आले. जिल्ह्यात भाजपा तीन, अजित पवार गट तीन आणि शिंदे गटाने पाच नगराध्यक्षपद मिळविले. त्यामुळे शिंदे गटाची चांगलीच
सरशी झाली.

Shinde group's strength will increase in the municipal council; BJP, Ajit Pawar groups are on equal footing

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *