निवडणूक प्रक्रियेला सुरुवात
पंचवटी : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी मनपाच्या पंचवटी विभागीय कार्यालयात मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार्या इच्छुकांची ना हरकत दाखला, तसेच निवडणूक लढविण्यासाठी लागणार्या कामांसाठी धावपळ दिसून आली.
नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 1 ते 3 साठी तिसरा मजला तर प्रभाग 4 ते 6 साठी दुसर्या मजल्यावर निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 3 साठी उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, तर पेठचे तहसीलदार शिवाजी गवळी व महापालिकेचे उपअभियंता जयवंत राऊत व भरत ठाकरे यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी पंचवटी विभागीय कार्यालयाच्या तिसर्या मजल्यावरील निवडणूक कार्यालयातून कामकाज पाहणार आहेत. तर प्रभाग 4 ते 6 साठी दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र वाघ यांची नियुक्ती करण्यात आली असून, तहसीलदार मुकेश कांबळे व मनपाचे कार्यकारी अभियंता गणेश मैंड व विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांची सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी पंचवटी विभागीय कार्यालयाच्या दुसर्या मजल्यावरील निवडणूक कार्यालयातून कामकाज
पाहणार आहेत.
निवडणूक प्रक्रियेला औपचारिक सुरुवात होताच पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी कार्यालयात हजेरी लावली. विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार काल विभागीय कार्यालयात दाखल झाल्याचे चित्र दिसून आले. काही उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांची माहिती घेतली, तर काहींनी थेट कर भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली. महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच पंचवटी परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून, येत्या काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पार पडावी, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले. आजपासून खर्या अर्थाने मनपाच्या विभागीय कार्यालयाला यात्रेचे स्वरूप बघायला
मिळणार आहे.
Aspirants rush to Panchavati Municipal Corporation office