350 ट्रॅफिक वॉर्डनची करणार भरती; महत्त्वाचे रस्ते, चौकांतील वाहतूक सुरळीत करणार
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासन मैदानात उतरणार असून, मानधनावर साडेतीनशे ट्रॅफिक वॉडर्र्नची भरती केली जाणार आहे. हे सर्व वॉर्डन पोलीस प्रशासनाच्या वाहतूक शाखेकडे राहणार आहेत. त्यांचा खर्च महापालिका प्रशासन करणार आहे. नाशिकमधील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर समस्या बनली आहे. पोलीस प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अनेक वाहतुकीच्या सिग्नलवर पोलीस कर्मचारी नसतात. परिणामी वाहतुकीचा फज्जा उडतो. मात्र, आता ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियोजन केले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात हजारो कोटी रुपयांची विविध विकासकामे सुरू करण्यात आली असून, आता प्रत्यक्ष कामांना वेग आला आहे. या ट्रॅफिक वॉर्डनच्या भरती प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी नाशिक महापालिकेवर राहणार आहे. त्यांचे मानधन व इतर सर्व खर्चदेखील महापालिकेकडूनच केला जाणार आहे. मात्र, या वॉर्डनचे प्रशिक्षण (ट्रेनिंग), तैनाती व वाहतूक नियोजनाची जबाबदारी शहर पोलीस दलाकडे राहील. या भरती प्रक्रियेसंदर्भात महापालिकेने लवकरच निविदा प्रक्रिया राबवून शहरातील सुमारे साडेतीनशे तरुणांना संधी देण्याचे नियोजन सुरू केले आहे. सिंहस्थपूर्व काळात वाहतूक व्यवस्थापन हे मोठे आव्हान ठरणार असल्याने ही भरती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. रस्त्यांची कामे सुरू असताना नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, तसेच शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा व वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहील, यादृष्टीने हे नियोजन करण्यात आले आहे. आगामी काळात या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याचे महापालिका व पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे वर्षभर वाहतूक कोंडी होणार आहे. यातून सुटका करण्यासाठी मनपाने नियोजन सुरू केले आहे. वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नाशिक महापालिका व शहर पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सिंहस्थ काळात तसेच त्याआधी सुरू असलेल्या विकासकामांच्या कालावधीत शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध उपायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेत शहरात 350 ट्रॅफिक वॉर्डनची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डाव्या बाजूची वाहतूक सुरू
रस्त्यांची कामे सुरू असताना उजव्या बाजूला अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, डाव्या बाजूची वाहतूक चालू ठेवल्यास कोंडी कमी होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. यासंदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घेण्यात येणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी सूचनाफलक व पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. नुकतीच मनपाची पोलीस प्रशासनाशी बैठक झाली. यात प्रमुख रस्ते व महत्त्वाच्या चौकांत डाव्या बाजूची वाहतूक सुरू ठेवण्याच्या पर्यायावर चर्चा झाली.
वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेतर्फे साडेतीनशे ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठीची तयारी लवकरच केले जाईल. या वॉर्डनची नियुक्ती केल्यानंतर वाहतूक शाखेकडून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी हे वॉर्डन वाहतूक सुरळीत करण्याचे काम करतील.
– मनीषा खत्री, आयुक्त, मनपा
Municipal Corporation at the ground to break the traffic jam