नाताळ सणाला नाशिकरोड, जेलरोड परिसरातील चर्चमध्ये जल्लोषात प्रारंभ

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
ख्रिस्ती बांधवांच्या नाताळ सणाला नाशिकरोड, जेलरोड परिसरातील चर्चमध्ये उत्साहात व जल्लोषात प्रारंभ झाला. जेलरोड येथील संत अण्णा महाचर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी मध्यरात्री विशेष प्रार्थना केली.
नाशिक-पुणे मार्गावरील बाळ येशू मंदिर तसेच नाशिकरोड येथील सेंट फिलिप्स चर्चेमध्येही विविध कार्यक्रम झाले. त्यानंतर ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांचे मुख्य धर्मगुरू असणारे बिशप बार्थोल बरेटो यांनी जेलरोडच्या संत अण्णा महाचर्चमध्ये मध्यरात्री नाताळचा शुभसंदेश दिला. प्रमुख धर्मगुरू फादर गिल्बर्ट डिनीस, सहाय्यक धर्मगुरू फादर प्रमोद मकासरे आदी मान्यवर
उपस्थित होते.
नाताळच्या पूर्वसंध्येला नाताळ गीते, पवित्र मिसा झाली. नाताळच्या दिवशी (दि.25) सकाळी आठला फादर गिल्बर्ट डिनीस, फादर प्रमोद मकासरे यांच्या उपस्थितीत पवित्र मिसा होईल. 26 डिसेंबरला सांस्कृतिक कार्यक्रम, गायन स्पर्धा होतील. 27 डिसेंबरला सकाळी दहाला आजारी व ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन चर्चेमध्ये आणण्यात येईल. त्यांच्यासाठी प्रार्थना व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. 27 रोजी ख्रिसमस देखाव्याची स्पर्धा होईल. विद्युत रोषणाईमुळे संत अण्णा महाचर्च व अन्य चर्च सजली आहेत. बाळ येशू जन्माला येणार आहे. या जन्माची वार्ता चर्चमधील बारा प्रतिनिधींनी ख्रिस्ती बांधवांच्या घरी जाऊन दिली. चर्चच्या भजनी मंडळाने घरोघरी जाऊन ख्रिस्त जन्माची गाणी सादर केली. नाशिकरोड परिसरात ख्रिस्ती बांधवांमध्ये अलोट उत्साह आहे. घरांवर आकाशकंदील लावण्यात आले आहेत. चर्चमध्ये रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. इंग्रजी शाळांमध्ये ख्रिस्त जन्माचे देखावे करण्यात आले आहेत. नाशिकरोडचे सेंट झेवियर्स चर्च, संत फिलिप चर्च तसेच देवळाली कॅम्प येथील गॅरिस चर्च आदी चर्चेमध्येही विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला. संपूर्ण कॅथोलिक ख्रिस्तसभा प्रभू येशू ख्रिस्तांचे जयंती वर्ष 2025 हे (ज्युबिली वर्ष) साजरे करीत आहे. आशेचे यात्रेकरू ही त्याची मध्यवर्ती कल्पना आहे. त्यानिमित्त चर्चमध्ये विश्वशांतीसाठी प्रार्थना केली जात आहे. समाजातील दुःखी, शोषित, पीडित लोक बरे व्हावेत, विश्वाचे कल्याण व्हावे यासाठी चर्चमध्ये विशेष प्रार्थना केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सर्व चर्चमध्ये मोठ्या उत्साहात ख्रिस्त जयंती साजरी केली जात आहे.

Christmas celebrations begin with joy in churches in Nashik Road and Jail Road areas

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *