देवगाव परिसरात बिबट्यांच्या दहशतीने ग्रामस्थांत भीती
लासलगाव : वार्ताहर
देवगाव परिसर बिबट्यांचा बालेकिल्ला बनला असून, बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना, 21 डिसेंबर रोजी येथील म्हसोबानगर (कासली) शिवारातील रावसाहेब रोटे यांच्या गट नंबर 603 मध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात अंदाजे तीन वर्षे वयाची मादी बिबट्या पिंजरा बंद झाला. 39 दिवसांत हा चौथा बिबट्या पकडला गेला. यापूर्वी शरद जोशी, चांगदेव शिंदे व पोलीसपाटील सुनील बोचरे यांच्या शेतात बिबटे पकडले गेले होते.
गेल्या काही आठवड्यांपासून दर दिवसाला कुठल्या ना कुठल्या भागात बिबट्याचे दर्शन व हल्ले होत आहेत. परिसरात जनावरांवरील हल्ल्यांमध्ये वाढ, रात्री शेतात जाण्याचा धोका आणि बिबट्यांची सतत होणारी हालचाल यामुळे बिबट्यांचा सामना नागरिकांसाठी नित्याचाच झाला आहे. अद्यापही परिसरात आणखी पाच बिबटे व दोन पिल्ले असल्याची नागरिकांची खात्री असून, त्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. विंचूरचे वनरक्षक विजय दोंदे, निफाडचे आधुनिक पथक सदस्य भारत माळी, सागर दुसिंग, काशीनाथ माळी, मयूर गांगुर्डे, ज्ञानेश्वर पवार आदींनी बिबट्याला ताब्यात घेऊन म्हसरूळ येथील वन्यजीव संरक्षण केंद्रात हलविले.
बिबट्यांनी यांच्यावर केले हल्ले
गेल्या महिन्याभरात बिबट्यांनी प्राथमिक शिक्षक प्रकाश कांगणे, संजय बडवर, आप्पा गव्हाणे, गोपाळ शिंदे, सुनील इंगळे, समर्थ कुलथे यांच्यावर हल्ले केले तर भाऊसाहेब बोचरे, राजेंद्र खुळे, रामकृष्ण बोचरे, बाळासाहेब थोरात, भाऊसाहेब कांदळकर, संजय सालगुडे, जनार्दन गव्हाणे, योगेश शिंदे, योगेश बोचरे यांच्या पाळीव पशुधन व श्वानांचा फडशा पाडला आहे.
बिबट्यांचे वास्तव्याची कारणे…
परिसरात मुबलक खाद्य, पाणी आणि लपण असलेल्या ऊस शेतीत कुत्रे, रानडुकरे यांच्या रूपाने सहज खाद्य उपलब्ध होत असल्याने बिबट्यांचे वास्तव्य आहे. राजेंद्र शिंदे यांच्या शेतात लावलेल्या पिंजर्याचे स्वयंचलित फाटक कार्यान्वित झाले नसल्याने दोन बिबट्यांनी भक्ष्याचा पिंजराच 200 फूट ओढीत नेल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकर्यांनी पाहिले.
असे झाले बिबटे पिंजरा बंद…
पहिला बिबट्या 12 नोव्हेंबर शरद जोशी, गट नंबर 485,
दुसरा बिबट्या 21 नोव्हेंबर चांगदेव शिंदे, गट नंबर 191/1,
तिसरा बिबट्या 4 डिसेंबर सुनील बोचरे, गट नंबर 414/2,
चौथा बिबट्या 21 डिसेंबर रावसाहेब रोटे, गट नंबर 603.