प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जगमलानी यांचे प्रतिपादन
नाशिक : प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांसाठी दीक्षांत संचलन समारंभ आयुष्यातील महत्त्वाचा व अविस्मरणीय असा दिवस आहे. आज घेतलेल्या शपथेद्वारे जी जबाबदारी आपण स्वीकारली आहे, ती अत्यंत महत्त्वाची असून, त्याचे सर्वजण निश्चितपणे गांभीर्यपूर्वक पालन करतील, असा आशावाद नाशिकचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी व्यक्त केला.
प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. 126 मधील 322 पुरुष व 67 महिला असे एकूण 389 सरळ सेवा प्रशिक्षणार्थी यांचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा दीक्षांत संचलन समारंभ काल सकाळी 9.30 वाजता महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथील मुख्य कवायत मैदान येथे झाला. यावेळी या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी प्रशिक्षणार्थींकडून मानवंदना स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे सहसंचालक अरविंद साळवे यांनी सर्व प्रशिक्षणार्थी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली तसेच सत्राचे अहवाल वाचन केले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी पुढे म्हणाले की, प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत दाखल होत असलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी आजचा हा दीक्षांत समारंभ आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा व अविस्मरणीय असा दिवस आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे व कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे या पोलिसांच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याकरिता तरुण व उत्साही असे अधिकारी राज्य पोलीस दलात प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात दाखल होत आहेत. आज घेतलेल्या शपथेद्वारे जी जबाबदारी आपण स्वीकारली आहे, ती अत्यंत महत्त्वाची असून, त्याचे निश्चितच गांभीर्यपूर्वक आपण पालन कराल, अशी आशा बाळगतो. दिवसेंदिवस गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असून, तंत्रज्ञान जसजसे विकसित होत आहे, त्या प्रमाणात सायबर व आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा गुन्ह्यांना हाताळण्याकरिता पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणे महत्त्वाचे ठरते. त्याकरिता आपण कालसुसंगत ज्ञान नेहमी आत्मसात करत राहिले पाहिजे. सध्या समाजात शालेय स्तरापासून अमली पदार्थांचा होणारा मोह ही पोलिसांसमोरील महत्त्वाची आव्हाने आहेत. या विषयावर जनजागृती तसेच कठोर कारवाई करावी.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई श्रीमती रश्मी शुक्ला, श्री नवल बजाज, संचालक, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, नाशिक, श्रीकृष्ण प्रकाश, अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद साळवे (सहसंचालक), उपसंचालक (प्रशासन), संजय बारकुंड, उपसंचालक (सेवांतर्गत प्रशिक्षण), अनिता पाटील, उपसंचालक (बाह्यवर्ग), प्रशांत खैरे, उपसंचालक (प्रशिक्षण), गीता चव्हाण, उपसंचालक (सुरक्षा व आयटी), पद्मजा चव्हाण आणि महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.
यांचा झाला सन्मान
सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून मानाची रिव्हॉल्व्हर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने प्रियांका श्यामला शांताराम पाटील या प्रशिक्षणार्थीस सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी पुरस्कार प्रियांका श्यामला शांताराम पाटील या प्रशिक्षणार्थीस मिळाला. तसेच दीपक अंत्याबाई बालाजी घोगरे यांना द्वितीय
सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच
सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी कवायत म्हणून वैभव लक्ष्मी प्रभाकर डोंगरे, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी कायदा व अभ्यासक्रम प्रियांका श्यामला शांताराम पाटील, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी-गोळीबार पवन रेखा दिलीप गोसावी, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी बाह्यवर्ग दीपक अंत्याबाई बालाजी घोगरे यांना सन्मानित करण्यात आले. हा दीक्षांत संचलन कार्यक्रम यूट्यूबवर लाइव्ह प्रसारित करण्यात आला.
Take the responsibility you have accepted seriously.