नववर्ष संकल्प 2.0

चला.. पुन्हा नवीन वर्ष सुरू होतंय (पुन्हा म्हणजे.. मागचंही वर्ष कधी नवीनच होतं की!) आता पुन्हा नवीन कॅलेंडर.. (पुन्हा म्हणजे.. अरे वाऽऽ.. समजलंही तुम्हाला.. दॅट्स ग्रेट!) सर्वसाधारणत: वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे मजा, मस्ती, पार्टी करण्याचा आणि सोबतच नवीन वर्षात कोणता संकल्प करायचा ते ठरवण्याचा दिवस. पण का ? कुणास ठाऊक? आमचे संकल्पही असतात विकल्पासह अन् तेही अगदी साधे सरळ..
उदाहरणच द्यायचे झाले तर… ’उद्यापासून सकाळचा किंवा मग सायंकाळचा चहा बंद..’ ’उद्यापासून जिम जॉइन करायची, नाहीतर स्विमिंग तरी.. अं.. किंवा अ‍ॅटलिस्ट पहाटे पाच किलोमीटर फिरायचे.. लेट झालो उठायला तर मिनीमम एखादा किलोमीटर तरी..’
’उद्यापासून थोड्याफार अंतरावर काम असेल तर लगेच बाइक न्यायची नाही. पायी जायचे. बायचान्स सुबह-सबेरे दूधवाला आलाच नाही अन् कॉलेज/ऑफिसला जायला उशीर होत असेल तर इन् सच कंडिशन बाइकचा पर्याय खुला..’
हे असे आमचे ’सर्वांगाने’ विचार करून अस्तित्वात आलेले (आणलेले) संकल्प.. काही तर उद्या सकाळी उठल्या उठल्या डोकं जड पडलेले असल्याने दारू सोडण्याचा संकल्पही सोडतील (अर्थात, तो संकल्प त्यांच्याकडून ’सुटेलच’ हे वेगळं सांगायला नको)
हे सगळं सांगण्यामागचा मुद्दा एवढाच की, या असल्या ’पळवाटा’ काढून केलेल्या संकल्पांनी काही फरक पडणार नाहीये. मनात जबरदस्त इच्छाशक्ती हवी. संकल्प तडीस नेण्याचा दृढ निश्चय हवा. पण खरं सांगायचं तर, आपल्यात, समाजात अन् पर्यायाने देशात बदल घडवायचा असेल तर केलेला संकल्पही तेवढ्याच उच्च पातळीचा हवा! आता हा संकल्प म्हणजे तरी नेमका कसा हवा? तर आपण एखाद्याकडून जी अपेक्षा ठेवतो त्या अपेक्षेच्या पूर्ततेसाठी स्वतःत घडवायचा बदल म्हणजेच ’तो’ त्या व्यक्तीने करायचा संकल्प होय. (या विचाराला जरा पॉझिटिव्हली घ्या हं.. नाही ’अपेक्षा’ शब्द बघून भलत्याच अपेक्षा मनात येतील म्हणून बोलतोय).
’आम्ही फक्त दाखवण्यासाठी, वर्तमानात फोटो येण्यासाठी आणि केवळ पक्षाची अन् स्वतःची हवा होण्यासाठी जनतेचे प्रश्न मांडणार नाही’ हा संकल्प सर्वप्रथम राजकारणी मंडळींनी सोडला पाहिजे.
राजकारणात प्रवेश करू पाहणार्‍यांसाठी एक संकल्प आहे.’ आम्ही कुठल्याही दादा, अण्णा, भाऊ, आप्पांचे वाढदिवस शुभेच्छा हे बॅनर्स लावणार नाही. खरं सांगतो, हे असले बॅनर्स लावूनही काही कोणी तुम्हाला लगेच ’उचलून’ घेणार नाही. तसेही पुढं पुढं करून पुढे जाण्यातही तशी मजा नसतेच. त्यापेक्षा गावातले/गल्लीतले प्रश्न पुढे होऊन सोडवा. त्यामागे निःस्वार्थ हेतू असू द्या. मग कोपर्‍यातल्या जाधव/पाटील/ गांगुर्डे काकांनी नाव काढलं तरी पुष्कळ.. लक्षात असू द्या… वाढदिवसाच्या बॅनर्सवरचे चेहरे सदासर्वदा बदलतील; पण मतदार यादीतले जाधव/पाटील /गांगुर्डे काका काही जागचे हलणार नाहीत. (बघा, विचार करण्याजोगा विचार आहे ना हा!)
लोकसभेत, विधानसभेत अधूनमधून डुलक्या घेणार्‍यांनाही जनतेच्या कामाचे प्रश्न पडायला हवेत आणि पडलेल्या प्रश्नांच्या उत्तरांवर त्यांचे एकमतही व्हायला हवे. या विशिष्ट कॅटेगिरीतल्या लोकांनी फालतू कारणासाठी गोंधळ न घालण्याचा संकल्प सोडायला हवा.
न्यूज चॅनलवाल्यांनी टीआरपीसाठी वाट्टेल ते न करता माहिती पोहोचवण्याच्या मुख्य हेतूने बातम्या देण्याचा संकल्प करायला हवा. लालेलाल, मोठमोठ्या अक्षरांसह ब्रेकिंग न्यूजचा भपका (भयानक बॅकग्राउंंड म्युझिकसह) अपघात, विस्फोट किंवा तत्सम रक्तरंजित बातम्या लाईव्ह दाखवू नये.
शेजार्‍यांनी केले म्हणून तेच करत बसण्यापेक्षा; त्यांच्याशी तुलना करून आपल्या कुटुंबाची वाताहत करून घेण्यापेक्षा, आपली स्वतःची आवड जोपासत; शेजार्‍यांऐवजी आपल्यापेक्षा गरीब लोकांशी तुलना करत आहे त्यात आनंदी राहण्याची कला आत्मसात करण्याचा संकल्प सोडल्यास, आपोआप मानसिक स्वास्थ जपले जाते, आनंदी जगण्याचे रहस्य समोर येऊ शकते.
’दोन समाज, व्यक्ती अथवा राज्यांमध्ये दुरावा निर्माण करणारे; व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीवर येणारे भावना भडकवणारे, कुणाची निंदा करणारे मेसेज स्वतः शाहनिशा न करता त्यावर विश्वास ठेवून ते तसेच पाच-पन्नास लोकांना फॉरवर्ड करू नये’ हाही मोलाचा संकल्प सर्वांनीच करायला हवा.अनलिमिटेड फ्री कॉलिंग आहे म्हणून गरज नसतानाही एक एक तास मोबाइलवर गप्पा मारत असणार्‍या मंडळींनीही मोजके अन् कामाचे बोलून उरलेला वेळ नवनवीन गोष्टी शिकण्यात घालवायचा संकल्प सोडला तर नक्कीच स्वतः त्यांना, त्यांच्या अन समोरच्या कुटुंबाला याने फायदाच होईल हे मात्र नक्की. महिनाभरात कुटुंबात येणार्‍या आणि जाणार्‍या पैशाचा व्यवस्थित हिशोब ठेवायचा संकल्प केला आणि त्या अनुषंगाने गरजा फिल्टर केल्या तर महिनाअखेर रडगाणं गाणार्‍यांना निश्चितच सुखाचे दिवस येतील. या नवीन वर्षात प्रेमवीरांनीही तिची पवित्रता जपण्याचा संकल्प सोडायला हवा. ’वो मेरी नहीं तो किसीकी नही…’ असले फालतू विचार फक्त हिंदी सिनेमामध्ये बघायला, ऐकायला शोभतात. ’तिच्या’बद्दलच्या ’त्याच्या’ मनातील भावना अशा संवाद लेखकाकडून दिग्दर्शकाच्या
निर्देशानुसार लिहून घेता येत नसतात. या वर्षात एवढे कळले तरी पुष्कळ!

                                                          – अमोल जगताप

New Year’s Resolutions 2.0

One thought on “नववर्ष संकल्प 2.0”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *