मुलांना संस्कार शिकविणारी कलाकृती-ज्ञानपोई

आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर यांचा संगम म्हणजे आई.. माणसाच्या आयुष्यातला पहिला गुरू म्हणून आईला मान दिला जातो. आईचे आपल्या मुलावर होणारे संस्कार जन्मापासूनच सुरू होत असतात. बाळाच्या प्रत्येक हालचालीची भाषा आईला कळत असते. आई ही ज्ञानाची ज्ञानपोईच असते. अशीच एक संस्कार शिकविणारी कवी अय्युब पठाण लोहगावकर यांची ’ज्ञानपोई’ ही काव्यसंग्रह साहित्य कलाकृती नुकतीच वाचनात आली. लहान मुलांच्या बौद्धिक क्षमता पाहून कवीने मुलांना आवडतील अशा कविता या संग्रहात समाविष्ट केलेल्या आहेत. या संग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय अर्थपूर्ण असून, बालमनाला मोहित करणारे आहे. या मुखपृष्ठावरून कवितासंग्रहातील कवितांचा आढावा घेणार आहोत.
ज्ञानपोई या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावर एक आई आपल्या मुलाला पाटीवर अ आ इ ई लिहायचे शिकवत आहे. शेजारी मिणमिणता कंदील दाखवला आहे. अतिशय सुंदर मुखपृष्ठ यावरून कवीच्या कवितांचा आकृतिबंध लक्षात येतो. गेली वीस-तीस दशकांपूर्वी बहुतांश महिला परिस्थितीमुळे म्हणा अथवा अन्य काही कारणाने अल्पशिक्षित होत्या. त्यांचे राहणीमान साधे होते, कपाळाला कुंकू, डोक्यावर पदर असा ग्रामीण पेहराव असायचा. कवीला बालपणी आईने शिकविलेले संस्कार आजही आठवतात, जसे ओल्या मातीला आकार देऊन छान मूर्ती घडविली जाते तसे आई मुलाला संस्काराने घडवीत असते. आई म्हणजे संस्कार देणारी ज्ञानपोईच असते म्हणून कवीने ज्ञानपोई शीर्षक कवितेत आईबद्दल लिहिले आहे की,
ज्ञानपोई नित्य देती,
ओल्या मातीला आकार,
छान ज्ञानमूर्ती घडवी,
सुसंस्काराची शिल्पकार…
मुलांना संस्काराचे ग म भ न शिकवीत असतांना शिक्षणाचे धडे देखील देत असते. आईच्या आठवणीने कवीला अस्वस्थ केले आहे आईने बोटाला धरून पाटीवर अ आ इ ई चे अक्षरे गिरवून घेतले, त्याची आठवण म्हणून कवी माझी ज्ञानपोई या कवितेत ती आठवण जागृत करून म्हणतात की –
पाटी पुस्तकांचा लावूनिया लळा,
आवडती केली मनी माझ्या शाळा,
शाळेसारखीच तूच होती आई,
आई अन शाळा माझी ज्ञानपोई
ज्ञानपोई या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावर एक मिणमिणता प्रकाश देणारा कंदील दाखवला आहे. मुखपृष्ठचित्रकाराने अतिशय कल्पकतेने हा कंदील दाखवला असून, या कंदिलाला मोठा गहन अर्थ आहे. गेल्या तीस-चाळीस दशकापूर्वी ग्रामीण भागात विजेची सोय नव्हती, रात्रीच्या वेळी अंधार दूर करण्यासाठी कंदील किंवा चिमणीचा (घासलेटचा दिवा) वापर केला जात होता. याच कंदिलाच्या उजेडात मुले अभ्यास करायची, आज ज्यांनी वयाची पन्नाशी ओलांडलेली आहे ते या कंदिलाचे महत्त्व जाणून आहेत. त्या जुन्या काळाची आठवण कविमनाला आली असावी म्हणून हा कंदील मुखपृष्ठावर दाखवला आहे. असे असले तरी यामागे एक गर्भित अर्थ आहे. ज्याप्रमाणे कंदिलाची काच आतल्या मिणमिणत्या वातीचे बाहेरील हवेपासून संरक्षण करून आसपासचा अंधार दूर करून प्रकाश देते त्याचप्रमाणे आई आपल्या मुलांना बाहेरील वाईट संगतीपासून दूर ठेवून, त्यांचे संरक्षण करत असते आणि सुसंस्काराने मुलांच्या जीवनवाटेवरील अंधार नाहीसा करून त्यांचा मार्ग प्रकाशमान करीत असते. आई ही कंदिलाच्या काचेसारखी आगीची धग, चटका सहन करून मुलांना जपत असते. या गर्भित अर्थाने मुखपृष्ठावरील कंदील दाखवला असावा असे मला वाटते आणि म्हणूनच कवी आई या कवितेत म्हणतात की-
रात्रंदिवस राबतात आईचे पवित्र हात,
अंधाराला दूर करी जशी समईची वात..
हल्ली लहान-लहान मुलांपासून थेट सत्तरी ओलांडलेल्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण मोबाइलच्या जाळ्यात अडकला जात आहे आणि हे अडकणे समाजाला घातक आहे, मुले मैदानी खेळ विसरत चालले आहे त्यामुळे मुलांची शरीर प्रकृती नाजूक बनत चालली आहे, मोबाइलवरील घातक खेळामुळे मुलांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. यांची कविमनाला खंत लागली आहे म्हणून कवी मोबाईल या कवितेत मांडतात की –
लहान मुले विसरली, सारे मैदानी खेळ,
गेम खेळून खेळून वाया,
घालवतात बहुमूल्य वेळ.
जीवघेण्या संकटातून
कधी सावरणार पिढी,
पब्जी खेळता खेळता,
किती तरी झाली वेडी.
मुलांनी मोबाइल हातात घेऊ नये. कदाचित मुखपृष्ठावरील आई आपल्या मुलाला हाच संदेश तर देत नाही ना? असे मनाला वाटते.
कवी अय्युब पठाण लोहगावकर यांच्या ज्ञानपोई या कवितासंग्रहातील सर्व कविता मुलांचे प्रबोधन करणार्‍या आहेत, समाजातील प्रत्येकाने आपल्या मुलांना योग्य संस्कार देवून माणूस म्हणून जगण्याचा मार्ग दाखवला पाहिजे. समाजाला मार्गदर्शक म्हणून ज्ञानपोई या संग्रहातील कविता प्रेरक ठरतील असे मला वाटते.
कवी अय्युब पठाण यांनी सामाजिक जाणिवा जपत आयुष्यात ज्यांनी लेखणीला उभारी दिली असे राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक डॉ. श्रीकांत पाटील, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक संजय खाडे, ज्येष्ठ कवी गणेश भाकरे, बालकवी रवींद्र चालीकवार, कवी एम. एम. खुटे आणि असंख्य बालमित्रांना अर्पण करून तेजस प्रकाशन संस्थेकडून प्रकाशन करून ही कलाकृती वाचकांपर्यंत पोहोचवली आहे. ज्यांच्या चित्रकारितेच्या कलेने वाचक मोहित होतो आणि मुखपृष्ठ पाहताच कलाकृती हातात घेतो, असे सरदार जाधव यांनी साकारलेल्या मुखपृष्ठाने कलाकृतीच्या वैभवात भर पडली आहे.

           – प्रशांत वाघ

Artwork that teaches children about values ​​- Gyanpoi

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *