डोअर टू डोअर प्रचारावर उमेदवारांचा भर

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खर्‍या अर्थाने सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल, छाननी व माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रचाराला वेग आला असून, सर्वच पक्षांचे उमेदवार मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी डोअर टू डोअर प्रचारावर भर देताना दिसत आहेत. मतदानासाठी अवघा चौदा दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने या मर्यादित काळात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान उमेदवारांसमोर उभे आहे.
घरोघरी भेटी देत उमेदवार मतदारांशी थेट संवाद साधत असून निवडून आल्यास कोणती विकासकामे केली जातील. यापूर्वी कोणती कामे करण्यात आली आहेत तसेच कोणते सामाजिक उपक्रम राबवण्यात आले, याची माहिती देण्यात येत आहे. नागरिकांच्या समस्या, अपेक्षा जाणून घेण्यावरही उमेदवार भर देत आहेत.
प्रचारासाठी कमी कालावधी उपलब्ध असल्याने काही उमेदवार सकाळी सात वाजल्यापासूनच प्रचाराला सुरुवात करत असून सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रचार सुरू ठेवला जात आहे. काही पुरुष उमेदवारांकडून रात्रीच्या वेळेत छोट्या मेळाव्यांचे, बैठकींचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यामाध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिला उमेदवारांकडून मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करून महिला मतदारांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
दरम्यान, तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी मतदारांच्या दारात पोहोचलेल्या नेत्यांना जनता कौल देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चौकसभांचे आयोजन

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी चौकसभा हे प्रभावी माध्यम मानले जात असल्याने सायंकाळच्या वेळी प्रचार रॅलींसह चौकसभांचे आयोजन केले जात आहे. अर्ज माघारीनंतर शहरात विविध पक्षांच्या बड्या नेत्यांच्या सभांचेही नियोजन करण्यात आले असून, त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रचार आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे.

Candidates focus on door-to-door campaigning

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *