शहरात पक्षी, नागरिकांचा जीव मात्र धोक्यात
नाशिक : वैशाली लिलके
शहरात पतंगबाजीसाठी वापरल्या जाणार्या नायलॉन मांजावर (काचेचा मांजा) राज्य शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी नायलॉन मांजाची साठवणूक, विक्री आणि त्याचा वापर करणार्यांवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. नायलॉन मांजावर बंदी असताना वापर सुरूच आहे. त्यामुळे नाशिक शहरात पक्षी व नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
नाशिक शहरात नायलॉन मांजाच्या निर्मिती, साठवणूक, विक्री आणि वापरावर कडक निर्बंध आहेत आणि नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर कारवाई (गुन्हे दाखल करणे, हद्दपार करणे) केली जाते, कारण तो पक्षी, प्राणी आणि मानवी जीवितासाठी धोकादायक आहे. मकर संक्रांतीच्या काळात या मांजाचा वापर वाढतो म्हणून पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कारवाई तीव्र केली जाते, अनेक विक्रेत्यांवर छापे टाकून मांजा जप्त केला जातो.
मकरसंक्रांतीच्या काळात पतंगबाजी वाढते आणि त्याच वेळी नायलॉन मांज्यामुळे होणार्या अपघातांच्या घटना समोर येतात. यामुळे पक्षी, प्राणी तसेच नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत.या मांज्यामुळे अनेक पक्षी गंभीर जखमी होतात. त्यांच्या मानेला, पंखांना आणि पायांना खोल जखमा होतात. अनेक वेळा पक्ष्यांचा मृत्यू होतो. काही पक्ष्यांचे पंख पूर्णपणे कापले जातात, त्यामुळे ते पुन्हा उडू शकत नाहीत. त्यामुळे दरवर्षी दुचाकीस्वार, पादचारी व इतर व्यक्तींना गळा व डोक्याला गंभीर जखमा होण्याच्या घटना वाढतात. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे.
पर्यावरणप्रेमींची जनजागृती
नाशिकमधील पर्यावरणप्रेमी व स्वयंसेवी संस्था नायलॉन मांजाविरोधात जनजागृती करत आहेत. ‘पक्षी वाचवा’, ‘नायलॉन मांजाला नकार’, ‘सुती मांजा वापरा’ अशा मोहिमा राबवल्या जात आहेत. शाळा व महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम समजावून सांगितले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेसाठी प्रशासनाने जागृती मोहीम राबविणे, शाळा-कॉलेजांमध्ये जनजागृती करणे आणि कठोर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याचे विविध सामाजिक संघटनांनीदेखील म्हटले आहे.
Nylon rope continues to be used despite ban