स्थानिक गुन्हे शाखा, किल्ला पोलिसांची यशस्वी कारवाई
मालेगाव : प्रतिनिधी
अवैध व्यवसाय व सराईत गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा व किल्ला पोलीस ठाण्याच्या पथकाने शहरात धडक कारवाई करत दोन संशयितांकडून देशी बनावटीचे दोन पिस्टल व आठ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रविवारी (दि. 4) किल्ला पोलीस ठाणे हद्दीतील इस्लामाबाद परिसरात सापळा रचण्यात आला. त्यावेळी हिदायत शरीफ शेख (वय 27, रा. न्यू नाना पेठ, पुणे) व अब्दुल मलिक अकिल अहमद (वय 19, रा. इस्लामाबाद, मालेगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीदरम्यान त्यांच्याकडून दोन देशी पिस्टल व आठ जिवंत काडतुसे आढळून आली.
दोन्ही आरोपींकडे अग्निशस्त्र परवाना नसल्याने त्यांच्याविरुद्ध किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू, सहायक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर विभाग सिद्धार्थ बारवाल व सहायक पोलीस अधीक्षक कॅम्प विभाग दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली
करण्यात आली.
आरोपी हिदायत शेख हा पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी व गंभीर दुखापतीसह एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती
पोलिसांनी दिली.
Country-made pistol seized from two suspects in Malegaon