मुलीची पहिली मैत्रीण आई

आई व मुलगी या नात्याचे रेशीम बंध फार विश्वासू व शक्तिशाली असते. मुलीचा पहिला विश्वास, पहिला आदर्श, ममत्वाचा झरा तिचे प्रेम
आईच असते.
मुलीला प्रत्येक संकटात मार्ग दाखविणे, तिच्या चुकांची जाणीव करून देणे, समाजातील चांगल्या वाईट प्रवृत्तीची जाण करून देणे, आईचे कर्तव्य आहे.
जसजशी मुलगी वयाने वाढत असते, तिच्या अनुभवांतील चढउतारावर तिच्या कोमल मनाला वेळप्रसंगी कणखर बनविण्याचे काम हे आईने शिकवले पाहिजे. कधी अन्यायाविरुद्ध आवाजही उठवला पाहीजे तर कधी जिथे आपल्या एखाद्या निर्णयाने कुणाचे काही चांगले होत असेल तर तडजोडही करता आली पाहीजे. हे बाळकडू देण्याचे कामही आईच करते.
मुलीमध्ये प्रेरणा, उत्साह, जिद्द, ध्येय, चिकाटी, मेहनत यांची शिकवण देताना तिच्या मनावर रुजेल असेच हळुवारपणे शब्दातून वास्तवाचे जाणीव कशी ठेवता आली पाहिजे हे समजावून सांगितले पाहिजे.
वयात येताना काही मुलींमध्ये इगो, राग, तिरस्कार या गोष्टी वाढत असतात.घरात, बाहेर, कुणी रागवले, घरात कुणी चुकीबद्दल हात उगारत मारले तर तिला सहन होत नाही.
तेव्हा छोट्या मोठ्या गोष्टीना प्रतीउत्तर देत वाटेल ते मुली बोलून जातात. पण तिच्यावर तेव्हा आई त्या क्षणाला चिडते. त्या चिडण्यामागे आईचा उद्देश वाईट नसतो. मुलींमध्ये सहनशीलता, समजुतदारपणा याचा अभाव असतो, तो यावा म्हणून ती काही वेळेस कठोर होते. हे मुलीनेही समजून घ्यायला हवे.
मुलींच्या मनातील महत्त्वाच्या बारीकसारीक समस्या आईजवळ बोलल्याने मन हलके होते व आई इतके विश्वासू जगात कोणीच नाही हे मुला-मुलींनी ओळखले पाहिजे. आईमध्ये कधीही स्वार्थीपणा नसतो. आई निःस्वार्थपणे आपल्या मातृत्वाचा प्रेमाचा झरा तिच्या लेकरांवर अखंड पाझरत असते.
मुलगी ही घराची शान असते.लहानपणीच तिच्या चिमण्या डोळ्यात आई-वडील तिच्या सक्षम कर्तृत्वाचे स्वप्न बघत असतात. तळहातावरच्या फोडाप्रमाणे तिला जपतात. तितकेच तिला वेळप्रसंगी स्वरक्षणाचेही ज्ञान वाढवत जाणेही गरजेचे असते. या जाणिवेने तिला आयुष्यात प्रत्येक वळणावर सर्व प्रकारे शिक्षण दिले जाते. तिच्या मनावर आयुष्याचे धडे गिरवतना कधी कटूगोड अनुभव शिकवतात तर कधी समाज, पालक व आई शिकवत असते. यातूनच मुली सक्षम होत जातात.
आई-वडिलांवर मुलींचे फार प्रेम असते. पण या नात्याची किंमत मुलींना सासरी गेल्यावर अधिक कळते. मुलीला आई-वडिलांच्या घरी लाडात वाढून मोठी झाल्यावर लग्नानंतर नवीन घराची जबाबदारी स्वीकारावी लागते. मग त्या घरातील विश्वच तिचे होत असते. तिथे कुठे कमी पडू नये याची शिकवण माहेरीच तिला दिलेल्या संस्कारातून मिळते.
माहेरचे संस्कार घेऊनच मुलगी सासरी आपली जीवन कहाणी घडवत असते. तिच्यातले संस्कार, सहनशीलता, थोडी तडजोड, समजूतदारपणा, मनाचा मोठेपणा, नीटनेटकेपणा हे गुण तिला प्रिय बनवत असतात. या गुणांवरच तिच्या आईची किंमत होत असते. मुलीचा पहिला गुरू ही आईच असते. सुसंस्कारी मुलगी पुढे सुलक्ष्मी, आदर्श आई, कर्तव्यदक्ष, कर्तृत्ववान महिला, एक आदर्श स्री म्हणून समाजात वावरत असते. हीच आईची प्रतिभा होते. गौरव होते, मातृत्वाचा अभिमान होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *