क्राइम डायरी

पतंग उडविण्यावरून वाद, दोघांचा चाकूने हल्ला
नाशिक : पतंग उडविण्याच्या वादातून दोघा भावांनी शेजार्‍यावर चाकूने वार करून हल्ला केल्याची घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
बिल्डिंगच्या टेरेसवर मुलांना घेऊन पतंग उडवत असताना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकावर दोघा भावांनी चाकूने वार केले. फिर्यादी नरेंद्र सुधाकर जाधव (रा. शिवाजी पार्क अपार्टमेंट, शिवाजीनगर) हे घरी असताना त्यांच्या बिल्डिंगमधील आरोपी रोहन नितीन पाटील (वय 25) हा बिल्डिंगच्या टेरेसवर गल्लीमधील मुलांना घेऊन पतंग उडवत होता. जोरजोरात भोंगा वाजवत होता. त्यानंतर फिर्यादी कामावर जाण्यासाठी निघाले असता, आरोपी रोहन पाटीलने त्याचा भाऊ प्रेम पाटील याला बोलावून घेतले आणि त्यांनी नरेंद्र जाधव यांच्यावर चाकूने वार केले. फिर्यादीच्या डोक्याला जखम झाली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 घरात घुसून सोन्याचे दागिने लंपास
नाशिक : बळजबरीने घरात घुसून महिलेचे तोंड दाबून गळ्यातील मणीमंगळसूत्र, एक ग्रॅम सोन्याची नथ, असा एकूण चाळीस हजार रुपये किमतीचा ऐवज घरासमोर राहणार्‍या मुन्ना प्रकाश निसाळ (रा. तवलीफाटा, पेठरोड) याने चोरून नेल्याची घटना राहुलनगर नाल्याजवळ विद्यानगर, मखमलाबाद येथे घडली. याप्रकरणी लक्ष्मी ब्रिजेशकुमार (वय 25) यांनी फिर्याद दिल्याने म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सिडकोतून मुलीला फूस लावून पळविले
नाशिक : सिडकोच्या महाराणाप्रताप चौकात राहणारी युवती मैत्रिणीकडे जाते, असे सांगून बेपत्ता झाली. तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती सापडली नाही. तिला कुणीतरी फूस लावून पळविल्याचा संशय आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार बनतोडे करीत आहेत.

सातपूरला एकाला मारहाण
नाशिक : सातपूरच्या श्रमिकनगर येथील विकी गोरक्षनाथ शर्मा (वय 40, रा. सिद्धीप्रकाश रो- हाउस, रूम नंबर 5, हिंदी शाळेजवळ) यांना साहिल रवी सावळे, श्रावण सावळे (दोघे रा. वृंदावन गार्डनसमोर, श्रमिकनगर) या दोघा भावांनी काहीही कारण नसताना विनाकारण मारहाण केली. धारदार शस्त्राने वार केले. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.

जुन्या नाशकात युवकाची आत्महत्या
नाशिक : जुन्या नाशिकच्या कथडा भागात राहणार्‍या संकेत भारत डांगरे (वय 29) याने सुलभ शौचालयाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या झाडास धोतराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हॉस्पिटलसाठी विवाहितेचा छळ
नाशिक : हॉस्पिटल बांधण्यासाठी माहेरून वडिलांकडून पैसे आणावेत, या कारणासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याने विवाहितेने याप्रकरणी गंगापूर पोलिसांत फिर्याद दिली. लासलगाव रोड, ता. निफाड येथील माहेर असलेल्या विवाहितेचा दि. 1 जून ते 9 डिसेंबर या कालावधीत पती, सासू, सासरे, मामेसासरे, नणंद यांनी छळ केला. फिर्यादीला माहेरून पैसे आणले नाहीत म्हणून वेळोवेळी टोमणे मारत उपाशी ठेवले. फिर्यादीला धमकी देऊन तुझी नोकरी व डिग्री सर्व जाईल, असे म्हणत तिचा मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून अखेर विवाहितेने गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक मधुकर कड करीत आहेत.

Crime Diary

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *