लासलगाव :समीर पठाण
विंचूर उपबाजार कांदा आवारात गुरुवार दि १९ रोजी झालेल्या कांदा लिलावात देशमाने येथील शेतकऱ्याच्या गोलटी स्वरूपातील कांद्याला ५१ रु क्विंटल बाजारभाव मिळाल्यामुळे नाराज झालेल्या या कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांदा न विकताच घरी जाणे पसंद केले
या बाबत मिळालेल्या माहितनुसार येवला तालुक्यातील देशमाने बुद्रुक येथील कांदा उत्पादक शेतकरी सुशील दुघड यांनी त्यांचा गोलटी स्वरूपातील कांदा विंचूर उपबाजार येथे लिलावासाठी आणला होता.लिलावात या कांद्याला २०० रुपयांची बोली लावण्यात आली परंतु कांद्याची प्रतवारी तुलनेत थोडी कमी असल्याने लिलावात शिव भोले या कंपनीने या कांद्याला ५१ रुपये प्रति क्विंटल बोली लावल्यामुळे नाराज झालेल्या या शेतकऱ्याने हा कांदा न विकताच घरी जाणे पसंद केले.तर बाजार समिती प्रशासनाने याबाबत सांगितले की लिलावास आलेला कांदा हा खूपच कमी गुणवत्ता असलेला असून खाण्या योग्य व प्रतवारी केलेला नसल्याने या कांद्याला जाहीर लिलावात कमी दर मिळाला आहे.
जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी ४०० ते ५०० बाजारभाव इतका कमी दर मिळत आहे. त्यामुळे कांद्यातून नफा तर सोडाच पण वाहतूक खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.त्यात देशमाने येथील शेतकऱ्याच्या गोलटी स्वरूपातील कांद्याला ५१ रु क्विंटल बाजारभाव मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
मी २० क्विंटल गोलटी स्वरूपातील कांदा विंचूर उपबाजार येथे लिलावासाठी आणला होता परंतु माझ्या कांद्याची प्रतवारी योग्य नसल्याचे कारण देत माझ्या कांद्याला ५१ रु प्रती क्विंटल बाजारभाव मिळाला असल्यामुळे मी हा कांदा घरी नेणे पसंद केले.गेल्या चार दिवसापासून दोन मजूर लावत कांद्याची प्रतवारी केली आणि बाजार समितीमध्ये कांदा विक्रीस आणला मात्र एवढा खर्च होऊनही कांद्याला पाच पैसे प्रति किलो असा दर मिळाल्याने शेतात पिकवायचे तरी काय.केंद्र सरकारने शेतकऱ्याना दिलासा द्यावा अन्यथा शेतकरी उद्रेक करेल व तो कोणाला परवडणारा नसेल.
सुशील दुघड कांदा उत्पादक शेतकरी
देशमाने
—बाजार समितीचे शेतकऱ्यांना आवाहन—
सद्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीस मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे.उष्णतेमुळे कांद्याची प्रत ही खराब होत आहे.साठवणूक झाल्यानंतर उर्वरित कांदा शेतकरी लिलावासाठी बाजार समितीत आणत आहे.उष्णतेमुळे या कांद्याची प्रत घसरली असल्यामुळे कांद्याला अपेक्षित भाव मिळत नाही.शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून लिलावासाठी आणल्यास योग्य असे बाजारभाव मिळतील असे आवाहन लासलगाव बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे