नागरिक व संघटनांनी 21 मेपर्यंत करावी नाव नोंदणी
नाशिक : प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागास प्रवर्गाच्या ओबीसी, व्हीजेएनटी आरक्षणाबाबत गठीत केलेल्या समर्पित आयोगास निवेदने देणाऱ्या नागरिक व सामाजिक संघटनांची नाव नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक शाखेत मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या मदत कक्षात 21 मे पर्यंत नाव नोंदणी करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.
नाशिक विभागात समर्पित आयोगामार्फत २२ मे सायंकाळी ०५.३० ते ०७.३० पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिक व विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्विकारण्यात येणार आहेत. यासाठी निवेदने देणाऱ्या नागरिक व विविध सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मदत कक्षात 21 मे सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील ओबीसी, व्हिजेएनटी आरक्षणाबाबत जनतेची मते जाणून घेण्याकरीता समर्पित आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. हा आयोग नाशिक विभागात २२ मे नमूद वेळेत विभागीय आयुक्त कार्यालयात भेट देणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकरी गंगाथरन डी. यांनी दिली.