नाशिक फेस्टिव्हलअंतर्गत ‘सूर्यकिरण एरोबॅटिक शो’ उत्साहात
नाशिक : प्रतिनिधी
भारतीय वायुदल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा विकास आराखड्यातील नाशिक फेस्टिव्हलअंतर्गत काल(दि.22)पासून दोन दिवस ‘एरोबॅटिक शो’ला अंत्यत उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी विमानांच्या चित्तथरारक कसरतींनी नाशिककरांच्या डोळ्यांची पारणे फेडली. काल गुरुवारी पहिल्याच दिवशी सकाळी सूर्यकिरण अॅरोबॅटिक टीमने हवाई प्रात्यक्षिक सादर केली. भारतीय वायुदलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीममधील ग्रुप कॅप्टन अजय दशरथी यांचे सहकारी स्क्वॉड्रन लीडर गौरव पटेल, संजीव सिंह, ललित वर्मा, संजीव दयाळ, श्री. विष्णू यांनी या विमानांचे सारथ्य केले, तर फ्लाइट लेफ्ट. नाशिकची सून असलेल्या कवल संधू यांनी या विमानांची तांत्रिक माहिती देतानाच या हवाई प्रात्यक्षिकांचे धावते वर्णन केले.
यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, हेमांगी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कर्नल विलास सोनवणे (निवृत्त), निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री महाजन यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना या शोचा आनंद घेण्याचे आवाहन केले. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारचा उपक्रम होत आहे. हा क्षण सैन्यदलाच्या कामगिरीला अभिवादन करण्याचा असल्याचे त्यांनी सांगितले. तर गंगापूर धरणावर हवाई प्रात्यक्षिक सादर करताना भारतीय वायुदलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीममधील ग्रुप कॅप्टन अजय दशरथी यांनी, नाशिककरांनो, खूप खूप आभार, असे म्हणत येथे जमलेल्या जनसमुदायाशी संवाद साधला.
विशेष म्हणजे, या शोची गेल्या दोन आठवड्यांपासून तयारी सुरू होती. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहनतळ, बैठक व्यवस्था, रस्ते आदी कामे पूर्ण केली, तर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने पाणी व स्वच्छतेची जबाबदारी घेतली होती. पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले. त्यांच्या मदतीसाठी माजी सैनिक, राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी होते. तर विद्युत विभागाने नागरिकांच्या बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्क्रीनची व्यवस्था केली होती. दरम्यान, धरण परिसरातील धुक्याच्या वातावरणामुळे शुक्रवारी (दि. 23) हा कार्यक्रम सकाळी 10 ऐवजी 11 वाजता सुरू होणार आहे. तरी नागरिकांनी सकाळी 10.45 वाजेपूर्वी आपल्या जागी आसनस्थ व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने
केले आहे.
देशभक्तीपर गीतांनी गंगापूर धरण परिसर दुमदुमला
भारतीय वायुदलाच्या विमानांनी केलेली चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि हजारो नाशिककरांनी भारत माता की जय, वंदे मातरम्सह विविध देशक्तीपर गीतांच्या जयघोषात त्याला दिलेल्या प्रतिसादाने नाशिकचा आसमंत निनादला. सूर्यकिरण विमानांच्या या कसरतींनी नाशिककरांच्या मनातील देशभक्तीच्या भावनांना व्यापक रूप दिले आणि देशप्रेमाचा हा जनसागर गंगापूर धरण क्षेत्रात एकवटला. सूर्यकिरण टीमच्या हवाई प्रात्यक्षिकांना नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला. पोलीस बॅण्डवर वाजविण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतांनी अवघा गंगापूर धरण परिसर दुमदुमला होता.
नाशिकमध्ये प्रथमच असा कार्यक्रम
भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमने नेत्रदीपक हवाई प्रदर्शने सादर केली. यात नऊ हॉक-132 विमानांचे वैमानिक आश्चर्यकारक आणि अचूक एरोबॅटिक युक्त्या सादर करत होते. नाशिकमध्ये प्रथमच असा कार्यक्रम गंगापूर धरणावर आयोजित करण्यात आला होता. तो महाराष्ट्रातीलही पहिलाच कार्यक्रम होता. हजारो लोक उपस्थित होते आणि आकाश तिरंग्याने भरून गेले होते, जे देशभक्ती आणि हवाईदलाच्या पराक्रमाचे प्रदर्शन करत होते.