वन विभागाने लावले पिंजरे
पंचवटी : प्रतिनिधी
म्हसरूळ-वरवंडी रोडवरील आळंदी डावा कालवा येथील उखाडे मळा, गरुड वस्ती व मोराडे वस्ती, शिर्के वस्ती, जाधव वस्ती, शिंदे वस्ती तसेच आडगावरोड भागात गेल्या दोन-तीन दिवसांत बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. याबाबत या भागाच्या नवनिर्वाचित नगरसेविका दीपाली गिते व नगरसेविका रूपाली नन्नावरे यांनी लगेच दखल घेऊन त्यांच्या पुढाकाराने तत्काळ वन विभागाशी संपर्क साधण्यात आला. वन विभागाला सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर उखाडे व गरुड मळ्यात बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाकडून तत्काळ पिंजरा लावण्यात आला आहे, अशी माहिती मनोज उखाडे व बंडू गरूड यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून उखाडे, गरुड, जाधव, मोराडे, शिर्के, धुळे, बर्वे, चव्हाण मळा भागात चार-पाच बिबट्यांचा धुमाकूळ असल्यामुळे शेतीचे कामकाज करणे अवघड झाले आहे. गुरुवारी उखाडे व गरुड मळ्यात बिबट्यांचा धुमाकूळ गरुड व उखाडे, मोराडे परिवाराला दिसून आला. याची वार्ता स्थानिक नवनिर्वाचित नगरसेविका दीपाली गिते व नगरसेविका रूपाली नन्नावरे यांना कळताच प्रारंभी नगरसेविका रूपाली नन्नावरे यांनी गरुड व उखाडे मळा भागात प्रत्यक्ष
भेट दिली. तेव्हा त्यांनी तात्काळ वन विभागाला सविस्तर माहिती दिली.त्यानुसार नाशिक वन विभागाचे वनक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ व वनरक्षक आशा वानखेडे, गोपाळ गरे, अशोक खांजोडे आदी अधिकारी व कर्मचारी पथक दाखल झाले. नवनिर्वाचित नगरसेविका रूपाली नन्नावरे व स्थानिक शेतकरी बंडू गरुड, मनोज उखाडे, सुनील मोराडे, गोकुळ जाधव, धर्मराज मोराडे, अमोल मोराडे, बाळा बर्वे यांच्यासमवेत वन विभाग पथकाने उखाडे व गरुड मळा आणि परिसरात सर्वत्र पाहणी केली. त्यावेळी ठिकठिकाणी बिबट्यांच्या पायाचे ठसे आढळून आले. सदर माहिती वन विभागाच्या वरिष्ठांना मिळाल्यानंतर तत्काळ पिंजरा लावण्यासाठी प्रयत्न झाले. आळंदी डाव्या कालवा भागात तसेच प्रामुख्याने गेल्या काही दिवसांपासून उखाडे व गरुड मळा याबरोबरच शिर्के, मोराडे, जाधव, देशमुख, चव्हाण, लभडे, खोडे, बर्वे, धुळे वस्ती या शेती भागात बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भीती दूर करण्यासाठी वन विभागाकडून उखाडे व गरुड मळा भागात बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. सध्या बिबट्या ताब्यात घेण्यासाठी वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती वनक्षेत्र अधिकार्यांनी दिली.
दिंडोरीरोड ते म्हसरूळ-वरवंडी आळंदी डाव्या कालवा परिसरात तसेच आडगाव रोड शेतवस्ती भागात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला बिबट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याचे आम्हाला समजले. त्याबाबत लगेच दखल घेऊन वन विभागाला कळवले. त्यानंतर वन विभागाकडून तत्काळ उखाडे व गरुड मळा भागात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. यासाठी यापुढेही आम्ही सर्व लोकप्रतिनिधींकडून नाशिक वन विभागाच्या मदतीने बिबट्यांचा धुमाकूळ पूर्णपणे थांबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
– रूपाली नन्नावरे, नगरसेविका, प्रभाग-1
नागरिकांमध्ये समाधान
नवनिर्वाचित नगरसेविका दीपाली गिते व नगरसेविका रूपाली नन्नावरे यांनी आपल्या प्रभागात सर्वप्रथम बिबट्यांचा धुमाकूळ थांबविण्यासाठी प्रयत्न करीत कामाला सुरुवात केली. याचा प्रत्यय आळंदी डाव्या कालवा येथील उखाडे व गरुड मळा भागात दिसून आला. यामुळे वरवंडी व आडगाव रोड शेतीवस्ती भीतीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.