सिडको : विशेष प्रतिनिधी
केवल पार्क परिसरातील हिंदुस्तान बेकरीच्या मागील बाजूस असलेल्या एका फर्निचर बनविणार्या कारखान्याला शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कारखान्यातील फर्निचर, सोफे, प्लायवूड व इतर साहित्य जळून खाक झाले. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
केवल पार्क परिसरात माधव प्लायवूड या नावाने फर्निचर निर्मितीचा कारखाना असून, येथे फर्निचर व सोफ्यांचे काम केले जाते. सायंकाळच्या सुमारास अचानक आगीच्या भडकलेल्या ज्वाळा दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले, तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर विभाग व अंबड एमआयडीसी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.आगीत कारखान्यातील महागडे फर्निचर, सोफे, प्लायवूड, रेग्झीनसह इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्याचे कारखाना मालकाने सांगितले.