एरोबॅटिक शोने नाशिककर नेत्रमुग्ध
नाशिक ः प्रतिनिधी
नाशिकच्या गंगापूर धरण परिसरातील अवकाश काल तिरंग्याने सजून गेले होते. भारतीय वायुदलाच्या सूर्यकिरण टीमने साकारलेल्या एरोबॅटिक शोने नाशिककरांच्या डोळ्यांची पारणे फेडली.
यावेळी अवकाशात विविध आकार आणि राष्ट्राभिमान जागवणारे दृश्य, भारताचा झेंडा अवकाशात तिरंगी धुराने साकारताना उपस्थितांतून देशाभिमान जागविणार्या घोषणांनी गंगापूर बोटक्लब दुमदुमून गेला होता. भरदुपारी सूर्यकिरण एरो शोमुळे जणूकाही इंद्रधनु साकारल्याचा अविस्मरणीय अनुभव नाशिकरांना अनुभवायला मिळाला.
भारतीय हवाई दल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा विकास आराखड्यातील नाशिक फेस्टिव्हलअंतर्गत दोन दिवसीय एरोबॅटिक शोचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आशिमा मित्तल (जालना), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, हेमांगी पाटील, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, कश्मिरा संख्ये, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कर्नल विलास सोनवणे (निवृत्त), ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्यासह सैन्य दलासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हवाई दलाचे स्क्वॉड्रन लीडर तेजेश्वर सिंह, ललित वर्मा, राहुल सिंह, एडवर्ड प्रिन्स, श्री. विष्णू, अंकित वशिष्ट, संजय सिंह, विंग कमांडर जसबीर सिंह, अभिमन्यू त्यागी यांनी वायुदलातील हॉक 132 या विमानांद्वारा चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. या टीमने आकाशात रंगांची उधळण करताना इंग्रजीतील वाय, मिग विमान, बाण, प्रेमाचे प्रतीक साकारत नाशिककरांना समर्पित केले.
पोलीस दलाच्या बॅण्डपथकाने विविध देशभक्तिपर गीते सादर केली. या प्रात्यक्षिकांचे धावते वर्णन फ्लाइट लेफ्ट. कवल संधू यांनी केले. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. एरो शोसाठी येणार्या नागरिकांसाठी पाणी, नाश्ता, स्वच्छता, आरोग्याची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आपदा मित्र, स्वयंसेवक, लाइफ जॅकेट, थ्रो बॅग्जसह आवश्यक साधने, उपकरणांनी सज्ज होता. आपत्ती व्यवस्थापनाचे पथक गंगापूर धरणात गस्त घालत होते. कार्यक्रमापूर्वी ऑलिम्पिक नौकानयनपटू दत्तू भोकनळ यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी गंगापूर धरणात नौकानयनाची प्रात्यक्षिके सादर केली.
शुल्कामुळे हवाई दल नाराज
भारतीय हवाई दल कोणत्याही एरो शोसाठी किंवा प्रदर्शनासाठी प्रेक्षकांकडून कधीही शुल्क आकारत नाही. लोकांमध्ये जनजागृती करणे आणि युवकांना हवाई दलाकडे आकर्षित करणे, हा यामागचा उद्देश असतो. नाशिकमध्ये एरो शोसाठी शुल्क आकारण्यामध्ये आपला संबंध नसल्याचे भारतीय हवाई दलाने स्पष्ट केले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी एरो शोच्या प्रदर्शनामुळे नाशिकचे ब्रँडिंग होण्यास मदत झाली आहे. प्रशासनाचे काम कौतुकास्पद आहे. तरुणांमध्ये देशसेवेची भावना निर्माण होऊन ते सैन्यदलात भरतीसाठी प्रवृत्त होतील. डोळ्यांचे पारणे
फेडणारा एरो शो होता.
– दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्रीगर्दीमुळे चेंगराचेंगरीसारख्या घटना घडू नयेत आणि गर्दी नियंत्रणासाठी नाममात्र शुल्क आकारले होते. या तिकीट विक्रीतून मिळालेले पैसे सैनिकांच्या कल्याणकारी योजनांसाठी देणार
आहे.
– आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिकनाशिक शहरात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे नाशिकच्या वैभवात
भर पडून नाशिकचा नावलौकिक उंचावणार
आहे.
– नरहरी झिरवाळ, अन्न व औषध प्रशासनमंत्री