महापौर, उपमहापौर अर्जासाठी आज शेवटची मुदत

शिंदेसेनेच्या चार नगरसेवकांनी घेतले अर्ज

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेची महापौर पदाची निवडणूक येत्या शुक्रवारी (दि. 6) पार पडणार आहे. भाजपचे सर्वाधिक 72 नगरसेवक निवडून आल्याने महापौर, उपमहापौर भाजपचाच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. महापौर, उपमहापौर अर्ज स्वीकृतीची आज मंगळवारी (दि.3) दुपारी दोनपर्यर्ंतची मुदत आहे. सोमवारी शिंदेसेनेच्या विलास शिंदे, राहुल दिवे, रंजना बोराडे व सुवर्णा मटाले या चारही नगरसेवकांनी प्रत्येकी दोन-दोन अर्ज घेतले. दरम्यान, शिंदेसेनेच्या चार नगरसेवकांनी अर्ज घेतल्याने शिंदेसेनेचे चालले काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिकेत भाजप एकटाच सत्तेत बसणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिंदेसेनेचे अवघे 26 नगरसेवक आहेत. मात्र, तरीही विलास शिंदे यांनी उपमहापौर पदाचे अर्ज घेतल्याने शिंदेसेनेला अद्याप भाजप सत्तेत वाटा देणार असल्याची शक्यता वाटत आहे का? अशी चर्चा रंगली आहे. महापौर, उपमहापौर अर्ज स्वीकृती मंगळवारी दुपारी दोनपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. दुपारी एकपर्यंतच अर्ज घेण्याची संधी आहे. यापूर्वी भाजपचे गटनेते अ‍ॅड. सुदाम बडोदे यांनी महापौर व उपमहापौर पदाचे प्रत्येकी दोन असे चार अर्ज प्रशासनाकडून घेतले आहेत. विशेष म्हणजे, भाजपच्याच नगरसेविका दीपाली गिते यांनीदेखील महापौर, उपमहापौरचे तब्बल सहा अर्ज घेतले आहेत. गिते यांनी स्वतंत्र अर्ज घेतल्यानंतर भाजपमधील अंतर्गत गटबाजी यानिमित्ताने चव्हाट्यावर आल्याचे दिसलेे. दरम्यानस याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी पक्षशिस्त खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगत इशारा दिला होता.
येत्या शुक्रवारी सकाळी दहाला महापालिकेत महासभेत महापौर व उपमहापौर पदाची निवड भाजप नगरसेवक करणार आहेत. कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार याकडे भाजप नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.

शिंदेसेनेच्या अपेक्षांना महाजनांकडून सुरुंग

मंत्री गिरीश महाजन यांच्या सत्तेत भाजपच बसणार या विधानामुळे शिंदेसेनेच्या अपेक्षांना सुरुंग लागला आहे. दरम्यान, शिंदेसेनेने भाजपकडे उपमहापौर, स्थायी सभापती, विषय समित्या सभापती आदी लाभाची पदे मागितल्याची चर्चा आहे. स्पष्ट बहुमत असतानाही शिंदेसेनेचे लाड का करायचे? असा प्रश्न भाजपमधील नगरसेवकांनी उपस्थित केला होता.

आतापर्यंत यांनी नेले अर्ज

भाजपचे अ‍ॅड. श्याम बडोदे, दीपाली गिते, तर शिंदेसेनेचे विलास शिंदे, राहुल दिवे, रंजना बोराडे व सुवर्णा मटाले यांनी अर्ज नेल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

Today is the last date for applying for Mayor and Deputy Mayor.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *