हरविलेल्या बालकांचा घेतला जाणार शोध
नाशिक : प्रतिनिधी
शहर परिसरातील हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘ऑपरेशन मुस्कान’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून, या मोहिमेसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, विशेष मोहिमेसाठी उपआयुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक आयुक्त संदीप मिटके यांची सहायक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत हरविलेल्या पाल्यांचा शोध घेऊन पालकांच्या चेहर्यावर हसू आणण्याची मोठी जबाबदारी पार पाडण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने अपहरण, फसवणूक, रागातून घर सोडलेल्या मुलांचा शोध घेतला जाणार आहे. शहर पोलीस आयुक्तालयामार्फत व्यापक प्रमाणात ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 13 पोलीस ठाण्यांतर्गत ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, स्वयंसेवी संस्था आणि सायबर पथक यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे स्टेशन, बसस्थानक, धार्मिक स्थळे, मंदिरे, औद्योगिक परिसर, रुग्णालये, हॉटेल्स, शहरातील संवेदनशील भागात ही मोहीम राबविण्यात येत आहे.
पोलीस ठाण्यानिहाय मिसिंग सेल
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील 13 पोलीस ठाण्यांत स्वतंत्र मिसिंग सेल स्थापन करण्यात येत आहे. त्यासाठी विभागीय स्तरावरील नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. पंचवटी – सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सरकारवाडा- सुधाकर सुरवाडकर, अंबड- सचिन बारी, नाशिकरोड-संगीता निकम.
कुटुंबांना मिळणार दिलासा
एखाद्या कुटुंबातील मुलगा बेपत्ता होणे किंवा अपहरण होणे, यामुळे संपूर्ण कुटुंब तुटून पडते. या कुटुंबांच्या चेहर्यावर मुस्कान परत आणण्यासाठी पोलिसांनी मानवतावादी दृष्टिकोनातून ही मोहीम हाती घेतली आहे.