तीस वर्षांचा करार, दोनशे चारचाकींची व्यवस्था
नाशिक : प्रतिनिधी
बहुचर्चित रविवार कारंजा येथील यशवंत मंडई इमारत जमीनदोस्त केल्यानंतर लवकरच तेथे मल्टिस्टोअर पार्किंग उभारली जाणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, मक्तेदारांना बुधवार(दि.11)पर्यंत यात सहभागी होता येणार आहे. दोनशे चारचाकी वाहनांची पार्किंग होईल. यादृष्टीने मल्टिस्टोअर पार्किंग उभारण्याचे नियोजन असून, ठेकेदाराच सदर बांधकाम करेल. दरम्यान, दोन मजले व्यावसायिक संकुल काढले जाणार आहे. सदर पार्किंग तीस वर्षांच्या करारावर चालवण्यास दिली जाणार आहे.
महापालिकेने हा प्रकल्प पी.पी.पी. (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महापालिका ड्युटी तत्त्वावर जागा उपलब्ध करून देणार असून, त्या ठिकाणी सुमारे 24 मीटर उंचीपर्यंत इमारत उभारण्यात येणार आहे. संपूर्ण इमारत उभारण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहणार असून, त्यालाच पार्किंग व्यवस्थापन, देखभाल व संचालन करावे लागणार आहे. या प्रकल्पासाठी ठेकेदाराला 30 वर्षांचा कालावधी देण्यात येणार आहे. या कालावधीत ठेकेदाराला पार्किंग शुल्क तसेच कमर्शियल गाळ्यांतून मिळणार्या उत्पन्नातून व्यवसाय करता येणार असून, त्याचवेळी महापालिकेलाही ठराविक वाटा देणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे महापालिकेला कोणताही थेट आर्थिक भार न पडता उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होणार आहे.
वाहतूक कोंडीची समस्या मल्टिस्टोअर पार्किंगमुळे सुटणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीत सदर बांधकाम करणे आवश्यक असेल. सिंहस्थापूर्वी हे काम मार्गी लावण्याचे प्रयत्न असतील.
– करिष्मा नायर, अतिरिक्त आयुक्त, मनपा
मक्तेदाराला टोइंगचेही अधिकार
यशवंत मंडईपासून एक किलोमीटर परिसरात टोइंगचे अधिकार ठेकेदाराला दिले जाणार आहेत. रस्त्यावर वाहने लावल्यास त्यांच्यावर टोइंगद्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सदर दंड हा पार्किंगचे जे शुल्क आहे, त्यानुसारच आकारले जाईल. रविवार कारंजा, मेनरोड, कापड मार्केट, सराफ बाजार या गजबजलेल्या बाजार भागातील वाहतूक कोंडीवर याद्वारे मार्ग निघणार आहे.