‘महसूल’चा जिल्हाधिकार्‍यांकडून मॅरेथॉन आढावा

नाशिक : प्रतिनिधी
महसूल विभागातील काही अव्वल कारकून, मंडळ अधिकारी आणि नायब तहसीलदारांना स्वतःच्या जबाबदार्‍यांची पुरेशी माहिती नसल्याने कामकाज अपेक्षित पद्धतीने होत नसल्याचे निरीक्षण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी नोंदविले. कामकाजात तातडीने सुधारणा कराव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसूल आढावा बैठक तब्बल साडेदहा तास चालली. सकाळी साडेदहाला सुरू झालेली बैठक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. यावेळी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, हेमांगी पाटील तसेच प्रशासन उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे उपस्थित होते. दरमहा होणार्‍या बैठकीत यावेळी पहिल्यांदाच तालुकानिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह नायब तहसीलदार, अव्वल कारकून आणि मंडळ अधिकार्‍यांनाही उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. प्रत्येक तहसील कार्यालयासाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्यात आली होती. संबंधित तालुक्याच्या कामकाजाचा किमान अर्धा तास सखोल आढावा घेण्यात आला. सर्वांनी पीपीटीद्वारे सादरीकरण केले.
महसूल शाखा, गौणखनिज प्रकरणे, न्यायालयीन कामकाज, सामान्य प्रशासन, गृह विभाग, कुळकायदा शाखा, डेटा व्यवस्थापन, निधी वितरण, रोजगार हमी योजना, महसूल वसुली, भोगवटादार वर्ग दोन ते वर्ग एक रूपांतरण, शर्तभंग प्रकरणे तसेच संजय गांधी योजनेची अंमलबजावणी या विषयांचा आढावा घेण्यात आला.
महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून, निवडणुका, मंत्र्यांचे दौरे, महसूल वसुली आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदार्‍या या विभागावर आहेत. त्यामुळे कामकाज अधिक सक्षम आणि जबाबदारीने पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले.

जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केली नाराजी

यावेळी काही कर्मचार्‍यांना कामकाजाबाबत समाधानकारक माहिती देता आली नाही. अधिकार्‍यांच्या प्रश्नांना स्पष्ट उत्तरे न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. पुढील बैठकीत ठोस सुधारणा दिसून याव्यात, अन्यथा जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकार्‍यांनी दिला.

Marathon review of ‘Revenue’ by District Collector

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *