भाजप नेते किरीट सोमय्या यांचा दावा
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेकडून 2001 नंतरच्या जन्म नोंदी ऑनलाइन केल्या जात आहेत. मात्र, यात अठरा हजार नावे संशयास्पद असून, हा जन्म नोंद प्रमाणपत्र घोटाळा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी. संबंधिताकडे जन्म प्रमाणपत्र आहे का हे तपासावे व खोट्या नोंदी असल्यास दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या
यांनी केली.
सोमय्या यांनी सोमवारी (दि. 16) महापालिकेला भेट दिली असता, यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेत बोगस जन्म नोंदींसंदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांनी बांगलादेशी, रोहिंगे यांच्या घुसखोरीसंदर्भात पत्रकार परिषदेत आरोप केले. राज्यातील पंचवीस महापालिकांत जाऊन तेथे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशींवर कारवाईची मागणी करणार आहोत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंध जोडला आहे. ही महाराष्ट्राशी गद्दारी असून ती भाजप मान्य करणार नाही असे सोमय्या यांनी यावेळी स्पष्ट केले. मालेगाव मध्ये तीन हजार 977 खोट्या जन्म नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी एक हजाराहून अधिक जणांवर गुन्हे दाखल झाल्याचा दावा त्यांनी केला. नाशिक महापालिकेकडून जन्म नोंदी ऑनलाईन करणे सुरु असून त्यात अठरा हजार नावे घुसविण्यात आली असून ती संशयास्पद असल्याचा खळबळजनक आरोप सौमय्या यांनी केल्याने खळ्बळ उडाली आहे. महापौर व आरोग्य विभागाने चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली. सातपूर येथे शेख नायजा नूर मोहंमद याचे जन्म प्रमाणपत्र खोटे असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येेणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
प्रश्न न आवडल्याने संताप
सरकारने गेल्या अकरा वर्षात किती अनधिकृत बाग्लांदेशीना देशाबाहेर काढले व त्यासंदर्भात डाटा आहे का ? असा प्रश्न सोमय्यांना विचारला असता त्यावर त्यांनी उत्तर देण्याएवजी पत्रकारांना हा वन टू वन प्रोग्राम आहे का ? असा उलट सवाल करत संताप केला.
खोट्या जन्म नोंदींची मनपाकडून चौकशी
किरीट सोमय्या यांनी खोट्या जन्म नोंदी संदर्भात मनपाच्या अधिकार्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी सातपूर विभागीय कार्यालयातून एका महिलेला बनावट जन्म दाखला दिल्याचा आरोप आहे. महापालिकेकडून चौकशी सुरू आहे. यासंदर्भात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास जन्म-मृत्यू दाखला देणारे कर्मचारी व दाखल्यावर स्वाक्षरी करणार्या अधिकार्यांवर कारवाई केली जाईल.
-हिमगौरी आहेर-आडके, महापौर, मनपा
Suspicion over 18,000 birth records in Nashik