डॉ. शेफाली भुजबळ : अंदरसूल, पाटोदा गटातील बचत गटांना मार्गदर्शन
येवला : प्रतिनिधी
बचत गटांच्या माध्यमातून महिला विविध वस्तूंचे उत्पादन घेतात. मात्र, योग्य मार्गदर्शन व विक्रीची व्यवस्थित यंत्रणा नसल्याने वस्तूंची विक्री होत नाही. यासाठी सामूहिक व्यासपीठ निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपले प्रयत्न आहे. मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या माध्यमातून बचत गटांतील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री होण्यासाठी सामूहिक व्यासपीठ निर्माण करू, असे प्रतिपादन मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ यांनी केले.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून बचत गटांतील महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने बचतगट मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. डॉ. भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत येवला तालुक्यातील अंदरसूल गटामधील महिला बचत गटांना सोमवारी मार्गदर्शन व हळदीकुंकू समारंभ कोटमगाव येथील जगदंबा लॉन्समध्ये, तर पाटोदा गटातील महिलांसाठी रामेश्वर पॅलेस, पाटोदा येथे पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी खासदार भुजबळ यांच्या हस्ते विजयी महिलांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी माजी खासदार भुजबळ, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, शहराध्यक्ष दत्ता निकम, युवा नेते मकरंद सोनवणे, रतन बोरणारे, संतोष खैरनार, संजय बनकर, माजी सभापती किसनराव धनगे, बाळासाहेब पिंपरकर, देवीदास शेळके, गणपत कांदळकर, ब्रह्मकुमारी नीतादीदी, डॉ. स्वाती सोनवणे, सरपंच ज्योती शेलार, सरपंच मोनाली घोरपडे, मजूर संघाच्या संचालक सविता धनवटे, विनिता सोनवणे, उज्ज्वला पैठणकर, राजश्री पहिलवान, आबा पाटील, संतोष खैरनार, क्लस्टर कोऑर्डिनेटर शुभम पवार, विशाल ठमके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. या शिबिरामुळे महिलांमध्ये उद्योजकतेबाबत जागरूकता निर्माण होऊन आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग अधिक सक्षम होईल, असा विश्वास डॉ. भुजबळ यांनी व्यक्त केला.
विविध मनोरंजनाचे खेळ
कार्यक्रमाला झी मराठी फेम अभिनेते संदीप जाधव यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध मनोरंजनाचे खेळ घेतले. या खेळात सहभागी होऊन विजयी झालेल्या महिलांना विविध बक्षिसे देण्यात आली. यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. डॉ.नागेश गवळी यांनी सूत्रसंचालन केले.
नवीन रोजगाराच्या संधी : मंत्री भुजबळ
दृकश्राव्य माध्यमातून मंत्री भुजबळ यांनी महिलांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बचत गटांतील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्याचा आपला प्रयत्न आहे. या माध्यमातून महिलांना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण देऊन नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमातून महिला स्वतःची ओळख निर्माण करू शकणार आहे. त्यातून त्या आपले उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतील.
Let’s create a collective platform for the sale of goods of self-help groups.